परवाना नसतानाही महापौरांनी चालविली बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 02:27 AM2018-12-02T02:27:30+5:302018-12-02T02:27:32+5:30
परवाना नसताना महापौर राहुल जाधव यांनी स्टेअरिंग हातात घेऊन चक्क बस चालवली.
संजय माने
पिंपरी : परवाना नसताना महापौर राहुल जाधव यांनी स्टेअरिंग हातात घेऊन चक्क बस चालवली. महापौरांकडे हलकी वाहने चालविण्याचा असलेला परवाना २०११ ला संपुष्टात आला आहे. १६ जून २००८ ला काढलेला परवाना २०११ ला मुदत संपुष्टात आल्यानंतर नूतनीकरण केलेला नाही. त्यामुळे बसचे सारथ्य करण्याने महापौरांपुढे अडचण निर्माण झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौरपदासाठी ओबीसीचे आरक्षण असल्याने भाजपाचे नगरसेवक जाधव यांना शहराचे प्रथम नागरिक होण्याचा बहुमान मिळाला. नगरसेवक म्हणून निवडून येण्यापूर्वी ते रिक्षा चालवित होते. त्या वेळी रिक्षा व्यवसायात असलेल्या त्यांच्या जुन्या मित्रांनी आठवणींना उजाळा दिला. ते महापौरांच्या संपर्कात आले. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक़्रमास मोरवाडी, पिंपरी येथे महापौर उपस्थित होते. त्या वेळी रिक्षावाले जुने मित्र भेटले. त्यांनी महापौर जाधव यांना रिक्षातून फेरफटका मारण्याचा आग्रह धरला. त्यांच्या आग्रहास्तव महापौरांनी रिक्षातून त्या मित्रांना शहराची सफर घडवून आणली.
गुरुवारी पीएमपीएलच्या ई-बसची (इलेक्ट्रिक बस) चाचणी चिखली येथे घेण्यात आली. त्या वेळी चक्क महापौर जाधव यांनी ही अत्याधुनिक बस चालवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. महापौरांनी ई- बसचे सारथ्य केल्यानंतर रिक्षावाला महापौर अशी त्यांची शहरभर चर्चा रंगली.
ही चर्चा रंगली असताना माजी महापौर वैशाली घोडेकर आणि अपर्णा डोके यांनाही तीन चाकी रिक्षात बसवून शहराची सफर घडवून आणली. विशेष म्हणजे जड वाहने चालविण्याचा परवाना नसताना महापौरांनी वाहतूक नियमांना बगल देऊन रिक्षा ते बसमधून रपेट करण्याचा कार्यक्रम सुरू ठेवला आहे.
सामान्य व्यक्तीला उच्च पदावर काम करण्याची संधी मिळणे, ही बाब त्या व्यक्तीसह समाजालाही प्रेरणादायी ठरणारी असते. त्याबद्दल कोणाचे दुमत नसते; परंतु महत्त्वाचे पद भूषविताना, त्या पदाची प्रतिष्ठा सांभाळणे, जबाबदारीचे भान राखणेही तितकेच महत्त्वाचे असते. पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांचा रिक्षावाला ते महापौर असा प्रवास झाल्याचा शहरभर गवगवा सुरू आहे. महापौर राहुल जाधवसुद्धा त्यात बेभान झाले असून, कोणी जुना मित्र भेटला तरी त्याला स्वत: रिक्षा चालवून शहरात फेरफटका मारू लागले आहेत. रिक्षावाले महापौर अशी ओळख निर्माण झाल्यानंतर रोजच रिक्षातून त्यांचा फेरफटका सुरू आहे.
>परवाना असल्याचा दावा
रिक्षातून फेरफटका मारण्यासाठी आपण रिक्षा चालवली. तसेच पीएमपीच्या ई-बसची चाचणी घेतली जात असताना, चिखली मार्गावर बसही चालवली. पहिल्यापासून रिक्षा असो की टेम्पो, ट्रक, अथवा बस कोणतेही वाहन आपण चालवू शकतो. ड्रायव्हिंगची आवड आहे, आपणाकडे सर्व प्रकारची वाहने चालविण्याचा परवानादेखील आहे. त्यामुळे काही काळजी करण्याचे कारण नाही.
- राहुल जाधव, महापौर
>वाहन परवाना मुदत संपलेला
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून १६ जून २००५ ला पहिल्यांदा दुचाकीचा परवाना घेतला. या परवान्याची मुदत २०२५ पर्यंत आहे. ट्रान्सपोर्टसाठी वापरात येणारी वाहने चालविण्याच्या परवान्याचे दर तीन वर्षांनी नूतनीकरण करणे आवश्यक असते. त्यांच्याकडील या परवान्याची मुदत २००८ ते २०११ पर्यंत होती. त्यांनी परवान्याचे नूतनीकरण केलेले नाही.