महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे
By admin | Published: March 10, 2017 04:59 AM2017-03-10T04:59:03+5:302017-03-10T04:59:03+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून नितीन काळजे, उपमहापौरपदासाठी शैलजा मोरे यांनी, तर राष्ट्रवादीकडून श्याम लांडे, उपमहापौरपदासाठी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून नितीन काळजे, उपमहापौरपदासाठी शैलजा मोरे यांनी, तर राष्ट्रवादीकडून श्याम लांडे, उपमहापौरपदासाठी निकिता कदम यांनी आज अर्ज सादर केला आहे. त्यामुळे १४ मार्चला निवडणूक होणार आहे. महापालिकेतील पक्षीय बलाबल पाहता भाजपाचाच महापौर आणि उपमहापौर होणार असल्याचे चित्र आहे. अधिकृत घोषणा बाकी आहे.
महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर कोण होणार याबाबत उत्सुकता होती. यासाठी चिंचवड विधानसभेतून नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, भोसरी विधानसभेतून नितीन काळजे, संतोष लोंढे, पिंपरी विधानसभेतून केशव घोळवे यांची नावे चर्चेत होती. महापौरपद भोसरी, पिंपरी, की चिंचवडला मिळणार याबाबत चर्चा रंगली होती. उमेदवारीअर्ज भरण्याची मुदत जसजशी जवळ येत होती. तोपर्यंत नितीन काळजे आणि नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे यांच्या नावांची चर्चा सकाळपासून होती. व्हॉट्स अॅपवरही महापौरपदाची निवड झाली, असे दावे केले जात होते. दुपारी तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यामुळे महापालिका भवनातील तिसऱ्या मजल्यावर समर्थकांची गर्दी झाली होती. महापौरांच्या कार्यालसमोरील दालन गर्दीने भरले होते.
दुपारी चारला पालकमंत्री गिरीश बापट, पक्षनेते एकनाथ पवार, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे महापालिकेत दाखल झाले. त्यानंतर सुमारे २० मिनिटे महापौरांच्या अँटी चेंबरमध्ये नेत्यांची चर्चा झाली. त्या वेळी महापौरपदासाठी इच्छुक उपस्थित होते. या वेळी सर्वांना नावाची उत्सुकता होती. पालकमंत्र्यांनी इच्छुकांची समजूत काढली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नितीन काळजे यांचे नाव सुचविले आहे, असे सांगितले. त्यानंतर काळजे आणि मोरे यांनी सायंकाळी पावणेपाचला अर्ज सादर केले. (प्रतिनिधी)
बिनविरोधचा प्रयत्न फसला
पक्षीय बलाबलानुसार विरोधक आणि अपक्षांची एकत्रित बेरीज केली, तरी सर्वाधिक मतांची जमवाजमव विरोधकांना करणे अशक्य आहे. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी उतरणार नव्हती. मात्र, बिनविरोध निवडणूक होऊ द्यायची नाही, अशी खेळी राष्ट्रवादीने खेळली आहे. त्यामुळे ऐनवेळी या निवडणुकीत राष्ट्रवादीनेही अर्ज भरला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा बिनविरोध महापौर निवडीचा प्रयत्न फसला आहे.