महापौरांचा ‘राष्ट्रवादी’ संपविण्याचा विडा
By admin | Published: October 21, 2016 04:36 AM2016-10-21T04:36:43+5:302016-10-21T04:36:43+5:30
सर्वसाधारण सभा तहकुबीच्या मुद्द्यावरून सत्तारूढ राष्ट्रवादी आणि महापौर यांच्यात आज पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली. राष्ट्रवादीला संपविण्याचा विडाच उचललाय
पिंपरी : सर्वसाधारण सभा तहकुबीच्या मुद्द्यावरून सत्तारूढ राष्ट्रवादी आणि महापौर यांच्यात आज पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली. राष्ट्रवादीला संपविण्याचा विडाच उचललाय, पक्षाचे वाटोळे केल्याचा आरोप सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाने केला. त्यावर महापौर शकुंतला धराडे सभागृहात गरजल्या, ‘‘मी महापौर आहे. मला शिकवू नका सभागृह कसे चालवायाचे ते. मी ठरविणार तहकुबी स्वीकारायची की नाही. सभागृहाचे नियम पाळा, असे मला म्हणता. अगोदर उभे राहिलेले सर्वजण खाली बसा.’’ त्यानंतर महापौरांनी सभा तहकुबीची सूचना स्वीकारली.
महापालिका सर्वसाधारण सभेत तिसऱ्यांदा महापौर विरुद्ध सत्तारूढ नगरसेवक असे चित्र आज दिसून आले. मूर्ती खरेदीचा अहवाल सभापटलावर सादर झाल्यानंतर सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांनी तहकुबीची सूचना मांडली. त्यास अनुमोदनही देण्यात आले. मात्र, त्याच वेळी सीमा सावळे आणि सुलभा उबाळे यांनी बोलण्याची संधी मागितली. त्यावर सभागृह नेत्यांनी तहकुबीची सूचना स्वीकारा, अशी सूचना केली. मात्र, महापौर गोंधळल्या. तहकुबीची सूचना स्वीकारायची, की सदस्यांना बोलू द्यायचे असा गोंधळ सुरू होता. त्याच वेळी विरोधी पक्षातील नगरसेवक चर्चेची मागणी करीत होते.
नारायण बहिरवाडे यांनीही तहकुबीची सूचना स्वीकारा, अशी मागणी केली. मात्र, महापौरांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्याच वेळी विरोधी पक्षातील नगरसेवकांकडून चर्चेची जोरदार मागणी सुरू होती. ज्येष्ठ नगरसेविका शमीम पठाण यांनीही तहकुबीची सूचना स्वीकारा, अशी मागणी केली. त्यानंतर सभेचे नियम पाळा, असे सभागृहनेत्यांनी सांगताच महापौर भडकल्या.
‘‘सभेचे नियम मला सांगता,
तुम्ही सर्वजण उभे राहून बोलताय ते नियमात बसते का? अगोदर
सर्वांनी खाली बसा. मला सभेचे नियम शिकवू नका. मी तहकुबी स्वीकारली नाही,’’ असे म्हणत चर्चा होऊ द्या, अशी भूमिका महापौरांनी घेतली. त्यानंतर सत्तारूढ नगरसेवक आणि महापौर यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरूच राहिली. (प्रतिनिधी)
उपरती : अखेर तहकुबीची सूचना स्वीकारली
शमीम पठाण यांना महापौरांनी बाई खाली बसा, असा आदेश दिला. त्यावर चिडून पठाण म्हणाल्या, ‘महापौर, तुम्ही पक्षाला संपविण्याचा विडाच उचललाय. पक्षाचे वाटोळे केले आहे.’’ त्यावर महापौर म्हणाल्या, ‘‘मी नाही, तुम्हीच वाटोळे केले. पक्षाने मला नेहमी अवमानकारकच वागणूक दिली आहे.’’ हे विधान अंगलट येऊ शकते, अशी जाणीव झाल्यानंतर महापौरांनी तहकुबीची सूचना स्वीकारली.
निषेध करा, मग दाखवतेच! : शकुंतला धराडे
पिंपरी : महापौर शकुंतला धराडे यांनी, सर्वसाधारण सभेत ‘राष्ट्रवादीनेच माझ्या बदनामीचा विडा उचललाय’ या विधानावरून महापौर कक्षात सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेविका आणि महापौर यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. महापौरांच्या वक्तव्याचा निषेध महिला नगरसेवकांनी केला. त्या वेळी ‘निषेध करा, मग मी दाखवतेच’ असे प्रतिआव्हान महापौरांनी दिले.
सभा तहकुबीच्या मुद्द्यावरून सभागृहात गोंधळ झाला. त्यानंतर महापौर कक्षातही सत्ताधारी नगरसेवक आणि महापौर यांच्यात वादावादी झाली. कक्षात येताच महापौरांनी एक असंसदीय शब्द वापरला. त्यावरून उपस्थित नगरसेविकांनी महापौरांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. ‘तुम्ही पक्षाचे नाव घ्यायला नको होते, असा प्रश्न केला. त्यावर महापौर चिडल्या. त्याच वेळी महापौरांच्या सभागृहातील भूमिकेचे सीमा सावळे आणि आशा शेंडगे यांनी स्वागत केले. महापौर आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुजाता पालांडे, ज्येष्ठ नगरसेविका शमीम पठाण यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. ते हमरीतुमरीवर आले. त्या वेळी पठाण म्हणाल्या, ‘‘मूर्ती खरेदीचा विषय कोणाचा होता?’’ त्यावर महापौर म्हणाल्या, ‘‘मी बिनधास्त आहे. पक्षाने मला वेळोवेळी चांगले बक्षीस दिले आहे. मूर्ती खरेदीचा आदेश मी २५ जूनला दिला होता. स्थायी समिती सभापतींनी करारावर सही केली. मग भ्रष्टाचार कोणी केला? त्यानंतर माझे विषयही स्थायीने स्वीकारले नाहीत. मी मागासवर्गीय म्हणून अन्याय केला जातोय.’’ त्यावर आपण पक्षाबद्दल बोलणार असाल, तर आम्हाला आपला निषेध करावा लागेल, असे पालांडे म्हणाल्या. (प्रतिनिधी)