मयुर ढोरे वडगाव नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:02 PM2018-07-20T12:02:02+5:302018-07-20T12:04:37+5:30
वडगाव नगरपंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वडगाव कातवी नगर विकास समितीचे मयूर प्रकाश ढोरे यांनी प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्याचा मान मिळविला आहे. भाजपाचे मावळ तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांचा 910 मतांनी पराभव करत ढोरे विजयी झाले.
लोणावळा : वडगाव नगरपंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वडगाव कातवी नगर विकास समितीचे मयूर प्रकाश ढोरे यांनी प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्याचा मान मिळविला आहे. भाजपाचे मावळ तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांचा 910 मतांनी पराभव करत ढोरे विजयी झाले. मावळ तालुक्याच्या राजकारणाचा गाभा असलेल्या वडगाव शहरात भाजपाला बसलेला हा दणका भविष्यातील धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मयूर ढोरे यांनी 4333 मते मिळाली तर भाजपाचे भास्करराव म्हाळसकर यांना 3423 मते व पंढरीनाथ ढोरे यांना 3363 मते मिळाली. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीची पुर्व तयारी म्हणून सर्वच राजकिय पक्षांनी वडगावची निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. मावळातील पंचायत समितीसह लोणावळा, तळेगाव, देहुरोड ही शहरे भाजपाच्या ताब्यात असताना वडगाव हे मुख्यालयाचे ठिकाण भाजपाच्या ताब्यातून गेल्याने हा भाजपासाठी मोठा दणका समजला जात आहे.