मतांच्या जोगव्यासाठी प्रादेशिक नेत्यांच्या सभा
By admin | Published: February 17, 2017 04:59 AM2017-02-17T04:59:59+5:302017-02-17T04:59:59+5:30
शहरात उद्योग, व्यवसाय व रोजगाराच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातील लोक स्थायिक झाले आहेत. ही लोकसंख्या एकूणात
पिंपरी : शहरात उद्योग, व्यवसाय व रोजगाराच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातील लोक स्थायिक झाले आहेत. ही लोकसंख्या एकूणात ६० टक्के आहे. त्यामुळे स्थानिकांप्रमाणेच बाहेरून आलेला मतदार निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष ज्या भागात हे लोक स्थायिक झाले आहेत, त्या प्रादेशिक भागातील नेत्यांच्या येथे सभा घेण्यासाठी धडपडत आहे. महापालिकेतील सत्तेसाठी प्रादेशिक नेत्यांच्या माध्यमातून मतांचा जोगवा मागण्यात येत आहे.
पुणे शहरालगतचा भाग म्हणून पूर्वीच्या पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीन गावांत औद्योगिक क्षेत्राचा विकास होत गेला. उद्योग, व्यवसाय व रोजगारानिमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येऊन अनेकजण येथे स्थायिक झाले. मूलभूत सुविधांच्या विकासाबरोबर लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली. त्यामुळे ही तीन गावे एकत्र करून त्याचे महापालिकेत रूपांतर झाले. आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून लौकिक झाला. महापालिकेच्या स्थापनेपासूनची ही सातवी पंचवार्षिक निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार आहे.
अनेक वर्षे उद्योगनगरीतील राजकारण गावकी-भावकीभोवती फिरत होते. मात्र, गेल्या काही वर्षांत स्थानिक नागरिकांपेक्षा इतर जिल्ह्यांतून आलेली लोकसंख्या वाढली आहे. सध्या हे प्रमाण ४०:६० असे आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीतील सत्ताकारणात शहराबाहेरून आलेल्या मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना व काँग्रेस पक्षांनी त्या प्रादेशिक भागातील नेत्यांच्या सभा शहरात घेण्यावर जोर दिला आहे.
शहरात कोकणातून आलेला मतदार खेचून घेण्यासाठी शिवसेनेने पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची सभा चिखली येथे घेतली होती. त्याला उत्तर म्हणून काँग्रेसने नारायण राणे आणि राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची सभा नियोजित केली आहे. विदर्भवासीयांची मते खेचण्यासाठी भाजपाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा नियोजित केली आहे. मराठवाड्यातील रहिवाशांसाठी काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीने धनंजय मुंडे, तर भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची सभा होणार आहे. तसेच, सातारा-सांगली परिसरातील मते खेचण्यासाठी राष्ट्रवादीने माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची सभा चिंचवडला नुकतीच घेतली. खानदेशातील धुळे, जळगाव व नंदुरबार येथील मूळ रहिवाशांची मते खेचण्यासाठी शिवसेनेने राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सभेचे नियोजन केले आहे. (प्रतिनिधी)