बैठका खूप झाल्या, शहराध्यक्ष कधी?
By admin | Published: August 28, 2015 04:20 AM2015-08-28T04:20:47+5:302015-08-28T04:20:47+5:30
बैठका आणि चर्चेचे गुऱ्हाळ खूप झाले. आता शहराध्यक्ष नियुक्त कराच, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली. येत्या १५ दिवसांत शहराध्यक्षाचे
पिंपरी : बैठका आणि चर्चेचे गुऱ्हाळ खूप झाले. आता शहराध्यक्ष नियुक्त कराच, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली. येत्या १५ दिवसांत शहराध्यक्षाचे नाव निश्चित केले जाणार असल्याचे आश्वासन गुुरुवारी झालेल्या विधानसभानिहाय बैठकीत देण्यात आले. यामुळे शहर नेतृत्वाची प्रतीक्षा कायम आहे.
शहराध्यक्षाची निवड, येत्या महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर पक्षबांधणी, कार्यकर्त्यांची भूमिका आदी संदर्भात चर्चा करण्यासाठी मनसे, विद्यार्थी, वाहतूक, कामगार, महिला, पर्यावरण आदी विभागांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक प्रभागनिहाय आकुर्डीतील एका हॉटेलमध्ये गुरुवारी झाली. चिंचवड, पिंपरी व भोसरी असे विधानसभानिहाय वेगवेगळी बैठक झाली. पक्षनेते व प्रवक्ते अनिल शिदोरे, नेते शिरीष सावंत, राज्य सचिव वसंत फडके यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सकाळी अकराला सुरू झालेली बैठक सायंकाळी सातला संपली. बैठकीस कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
शहराध्यक्ष कसा असावा, सध्याची पक्षाची स्थिती, पक्षबांधणीसाठी काय धोरण असावे, नाराजीची कारणे आदींबाबत कार्यकर्त्यांनी आपली मते मोकळेपणाने मांडली. कार्यकर्ते मनसोक्त बोलले. शहराध्यक्षाच्या निवडीबाबत गेल्या चार वर्षांपासून अनेक बैठका झाल्या. आता बैठका आणि चर्चा पुरे, असे ठणकावून सांगत, त्वरित शहराध्यक्ष नियुक्त करण्याची आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली. कार्यकर्त्यांचा रोख पाहून येत्या १५ दिवसांच्या आत शहराध्यक्षाची निवड निश्चित केली जाईल, असे आश्वासन वरिष्ठांनी दिले. बैठकीचा अहवाल ते पक्षनेते राज ठाकरे यांना देणार आहेत. ठाकरे हे पुणे मुक्कामी आहेत. चर्चेतून शहराध्यक्षाचे नाव ठरविले जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
शहराध्यक्ष निवडीसंदर्भातील ही पहिलीच बैठक होती. यापूर्वी याबाबत एकही बैठक झाली नाही. चिंचवड येथे झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यापूर्वी विधानसभा आणि लोकसभा उमेदवारीबाबत बैठका झाल्या होत्या. १५ दिवसांच्या आत कोणत्याही परिस्थितीत शहराध्यक्षाची निवड जाहीर केली जाणार आहे.- अनिल शिदोरे