संत तुकाराम महाराज आणि मोरया गोसावी भेटीचा उद्योग नगरीत रंगला अभूतपूर्व सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 02:09 PM2018-08-08T14:09:55+5:302018-08-08T14:10:52+5:30
पंढरीच्या दर्शनानंतर विविध पालख्या परतीच्या प्रवासाला निघाल्या होत्या. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे टाळ-मृदंगाच्या गजरात उद्योगनगरीने स्वागत केले होते.
पिंपरी : पंढरीची आषाढीवारी करुन संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखीसोहळा पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत परतला. पिंपरीकरांचा पाहुणचार घेऊन सोहळा सकाळी सव्वा आठ वाजता पिंपरीगावातून देहूकडे मार्गस्थ झाली. यावर्षी प्रथमच सोहळा चिंचवडगाव मार्गे नेण्यात आला. मोरया गोसावींच्या चिंचवडला सकाळचा विसावा झाला. यावेळी महासाधू मोरया गोसावी आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अपूर्व भेटीचा सोहळा अनुभवला.
पंढरीच्या दर्शनानंतर विविध पालख्या परतीच्या प्रवासाला निघाल्या होत्या.जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे टाळ-मृदंगाच्या गजरात उद्योगनगरीने स्वागत केले होते. पिंपरीगावात मुक्काम झाला. लिंक रस्ता मार्गे सोहळा चिंचवडगावात पोहोचला. शहरवासियांनी पालखीचे जंगी स्वागत केले. चिंचवडच्या गांधी चौकात पालखीने विसावा घेतला. यावेळी पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे, चिंचवड देवस्थानाचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महासाधू मोरया गोसावी आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अपूर्व भेटीचा सोहळा अनुभवला. यावेळी मंदार देव महाराज यांच्या हस्ते तुकाराम महाराजांची आरती करण्यात आली. पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे यांचा सत्कार देव महाराजांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महासाधू मोरया गोसावी आणि ज्ञानोबा तुकाराम महाराजांच्या जयघोषाने चिंचवडगाव दुमदुमून गेले.सकाळी पावणेबाराला सोहळा निगडीतील भक्ती शक्ती चौकात पोहोचला. त्यावेळी मोठया प्रमाणावर भाविक उपस्थित होते.
............................