पतीच्या निधनामुळे पत्नीला मानसिक धक्का
By admin | Published: June 10, 2015 05:00 AM2015-06-10T05:00:17+5:302015-06-10T05:02:05+5:30
अवेळी पाऊस आल्याने दुचाकीऐवजी एसटी बसमध्ये ते बसले आणि स्थानकामध्ये उतरल्यावर दोन बसमध्ये चिरडून त्यांना जीव गमवावा लागला.
पिंपरी : अवेळी पाऊस आल्याने दुचाकीऐवजी एसटी बसमध्ये ते बसले आणि स्थानकामध्ये उतरल्यावर दोन बसमध्ये चिरडून त्यांना जीव गमवावा लागला. संदीप जयसिंग मोरे (वय ३५, रा. विजयनगर, काळेवाडी, मूळ गाव जाधव पार्क, रामानंदनगर, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. डोळ्यांसमोर झालेला मृत्यू पाहून पत्नी प्रतीक्षा यांना मानसिक धक्का बसला. त्यातून त्या अजुनही सावरलेल्या नाहीत.
संत तुकारामनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील विधी महाविद्यालयात ते ग्रंथपाल होते. ते विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिचित होते. ११ वर्षांपासून काळेवाडी येथे राहत होते. गावी जाताना ते नेहमी दुचाकीवरून पत्नी व मुलगीसोबत जात. मात्र, उन्हाळी सुट्टीसाठी काही दिवसांपूर्वी जाताना पाऊस सुरू झाल्याने ते एस.टी.ने गेले होते.
सुट्टी संपवून रविवारी (दि. ७) दुपारी १२ वाजता ते पत्नी व मुलगीसोबत एसटीने कोल्हापूरहून निघाले. वल्लभनगर बसस्थानकावर उतरल्यावर त्यांनी पत्नी व मुलगीला बाजूला उभे गेले आणि रिक्षा आणण्यासाठी स्थानकाबाहेर निघाले. मात्र, याचवेळी दोन
एसटी बसमध्ये सापडून जागीच मृत्यू झाला. सोमवारी पहाटे कोल्हापूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)