दारु पिण्यासाठी पैसे मागत असल्याने डाेक्यात सिमेंटचा गट्टा घालून भावाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 06:43 PM2018-10-07T18:43:04+5:302018-10-07T18:44:48+5:30
व्यसनाधिन भाऊ सातत्याने दारु पिण्यासाठी पैसे मागत असल्याने मतीमंद अाराेपीने डाेक्यात सिमेंटचा गट्टा घातल्याने त्याच्या भावाचा मृत्यू झाला.
निगडी : ओटास्किम पेठ क्रमांक २२ येथील मिलिंदनगर येथे राहणाऱ्या दोघा भावांची रविवारी सकाळी ८ च्या सुमारास किरकोळ कारणावरून हमरातुमरी झाली. रागाच्या भरात एकाने सिमेंटचा गट्टू उचलुन दुसऱ्याच्या डोक्यात घातला. गंभीर जखमी झाल्याने त्यातील एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तुकाराम गुरप्पा शिंगे (वय २५) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे, तर सुरेश गुरप्पा शिंगे असे आरोपीचे नाव आहे.
दोन सख्या भावांवर अज्ञात आरोपींनी रविवारी सकाळी ८ च्या सुमारास हल्ला केला. त्यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा भाऊ जखमी झाला. असे वृत्त सर्वत्र पसरले. या घटनेत तुकाराम शिंगे याचा मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ सुरेश हा जखमी असल्याने त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. निगडी पोलिसांच्या पथकाने सुरेश यांच्याकडे घडलेल्या घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून योग्य उत्तरे मिळत नव्हती. त्याच्याबद्दल पोलिसांनी परिसरातील लोकांकडे विचारपुस केली असता, तो मतीमंद असल्याचे समजले. मतीमंद असल्याने घडलेल्या घटनेची तो विसंगत उत्तरे देत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. सुरेशकडून योग्य प्रकारे माहिती मिळत नव्हती. अधिक चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची माहिती दिली. भाऊ तुकाराम हा दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्याने माझ्याशी वाद घातला. दोघेही हमरीतुमरीवर आल्यानंतर झटापट झाली. घराच्या दारात पडलेला सिमेंट गट्ट उचलून तुकारामला मारला. डोक्याला मार लागल्याने तुकाराम जागीच कोसळला. अशी कबुली सुरेशने दिली. निगडी पोलिसांच्या पथकाने अवघ्या सहा तासात या खून प्रकरणाचा उलगडा केला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
एक व्यसनाधिन, दुसरा मतीमंद
ओटास्किम येथे राहणारे शिंगे कुटुंबिय मुळचे कर्नाटकचे, अनेक वर्षापासून आई आणि तिघे भाऊ येथे वास्तव्यास आहेत. तुकाराम व्यसनाधिन तर सुरेश मतीमंद आणि मोठा भाऊ बिगारी काम करणारा असे तीन भाऊ. त्यातील तुकाराम, सुरेश हाताबाहेर गेलेले. तुकाराम रोजंदारी करीत तर सुरेश भिक मागत असे. त्यांच्यात नेहमीच खटके उडत. किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात त्यांच्यातील एका भावाचा जीव गेला.