मुंबईतून मॅफेड्राॅन आणले; ‘अंमली’ विरोधी पथकाने पकडले, ११६ ग्रॅम ड्रग्ज जप्त
By नारायण बडगुजर | Published: October 12, 2023 08:00 PM2023-10-12T20:00:45+5:302023-10-12T20:00:52+5:30
जाधववाडी-कुदळवाडी रस्त्यावर वडाचामळा येथे दोघेजण संशयितपणे थांबले असून त्यांच्याकडे अंमली पदार्थ असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली
पिंपरी : मुंबई येथून पिंपरी-चिंचवड शहरात विक्रीसाठी मेफेड्राॅन (एमडी) आणले. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने चिखली येथे कारवाई करत दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ११६ ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त केले. ही कारवाई मंगळवारी (दि. १०) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास केली.
रामकुमार रामसजीवन मिश्रा (४५, रा. नालासोपारा, पालघर. मूळ रा. उत्तर प्रदेश), अब्दुल मुशरफअली कलीम उर्फ सिद्दिकी (३५, रा. कुदळवाडी, चिखली. मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार प्रसाद जंगीलवाड यांनी बुधवारी (दि. ११) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधववाडी-कुदळवाडी रस्त्यावर वडाचामळा येथे दोघेजण संशयितपणे थांबले असून त्यांच्याकडे अंमली पदार्थ असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून रामकुमार आणि अब्दुल या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता मेफेड्रॉन ड्रग्ज विक्रीसाठी आणले असल्याचे त्यांनी सांगितले. दोघांकडे ११६ ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्ज आढळून आले. ड्रग्ज, दोन दुचाकी, रोख रक्कम, दोन मोबाईल फोन असा एकूण १३ लाख ३५ हजार ५९० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. संशयितानी हे ड्रग्ज गोरेगाव मुंबई येथून महंमद शकील उर्फ गुप्ता (रा. भगतसिंगनगर, गोरेगाव, मुंबई) याच्याकडून आणला असल्याचे सांगितले. त्यामुळे महंमद शकील उर्फ गुप्ता याच्या विरोधात देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला.