ग्राहकांवर सवलतींचा व्यापाऱ्यांकडून वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 01:28 AM2019-04-06T01:28:59+5:302019-04-06T01:29:15+5:30
गुढीपाडवा : बाजारपेठेत खरेदीसाठी लागल्या रांगा
पिंपरी : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. यात कपडे, सौंदर्य प्रसाधने, सोने खरेदी, दागिने, घरगुती वस्तू, गृहसजावटीचे साहित्य, वाहन, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह स्वप्नातील घराचाही समावेश असतो. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त अशा वस्तूंवर सवलतींचा वर्षाव करण्यात आला आहे. त्यामुळे पाडव्याच्या पूर्व संध्येला बाजारपेठेत ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.
गुढीपाडव्याला नववर्षारंभ होतो. तसेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याचे मानण्यात येते. त्यानिमित्त शुभकार्य करण्यास प्राधान्य देण्यात येते. त्यात खरेदीस अधिक महत्त्व असते. त्यामुळे गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत व्यावसायिक आणि विविध कंपन्यांनी ग्राहकांना सवलती देऊ केल्या. त्याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनीही खरेदीला पसंती दिली. पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात अद्ययावत सोयीसुविधा असलेले गृहप्रकल्प मोशी, रावेत, भोसरी, इंद्रायणीनगर भागात उभारण्यात येत आहेत. असे ग्राहक सदनिका ‘बुक’ करण्यास प्राधान्य देत आहेत.
उत्साह : आॅनलाइन खरेदीलाही पसंती
४सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, रहाटणी, मोशी, तळवडे परिसरात आयटीयन मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. घराबाहेर पडत तेही खरेदीचा आनंद लुटत आहेत. काही ग्राहकांनी घरबसल्या आॅनलाइन खरेदीला पसंती दिली. त्यासाठी कंपनी तसेच विक्रेत्यांकडून घरपोच सेवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
४रेडिमेड कपडे आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांची भव्य दालने आणि सराफी पेढ्या शहरात आहेत. या दालनांमध्ये आणि सराफी पेढ्यांमध्ये सोने, तसेच दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी आहे. कुठे घडणावळीवर सवलत, तर कुठे सोन्याच्या दागिन्यांवर चांदीचे दागिने सवलतीत देण्यात येत आहेत. कपड्यांतही तसेच दिसून येत आहे. एकावर एक मोफत किंवा आकर्षक ‘डिस्काउंट’ दिला जात आहे.