पिंपरीत ९७ मंडळांचा गणरायाला निरोप

By admin | Published: September 17, 2016 12:45 AM2016-09-17T00:45:40+5:302016-09-17T00:45:40+5:30

ढोल-ताशांचा दणदणाट, डीजेच्या तालावर बेभान होऊन नाचत, भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून पिंपरीत गणरायाला निरोप दिला

Message to the people of 970 congregations in the Pimpri | पिंपरीत ९७ मंडळांचा गणरायाला निरोप

पिंपरीत ९७ मंडळांचा गणरायाला निरोप

Next

पिंपरी : ढोल-ताशांचा दणदणाट, डीजेच्या तालावर बेभान होऊन नाचत, भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून पिंपरीत गणरायाला निरोप दिला. सुमारे अकरा तास मिरवणूक सुरू होती. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...’ जयघोषाने आसमंत दणाणला. एकूण ९७ मंडळांनी गणरायाला निरोप दिला. फुलांची मोहक आरास, वारकऱ्यांचे पथक, गणेशभक्तांना अन्नदान असे या सोहळ्याचे वैशिष्ट्य होते.
पिंपरीतील शगून चौक येथे महापालिकेच्या वतीने गणेश मंडळांच्या स्वागतासाठी व्यवस्था केली होती. शगून चौकमार्गे लिंक रस्त्याने मंडळे विसर्जन घाटावर जात होती. दुपारी पावणेएकला जी. के. एन. सेंटर मेटल प्रायव्हेट लिमिटेडचा पहिला गणपती चौकात आला. महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर वरुण पार्क सोसायटी व झुलेलाल तरुण मंडळ विसर्जन घाटाकडे रवाना झाले. गणेश मंडळांनी डीजेएवजी ढोल-ताशा या पारंपरिक वाद्याला अधिक प्राधान्य दिले होते.
मावळ, मुळशी आणि खेड या तालुक्यांतील ढोल-ताशा आणि झांज पथके लक्षवेधी ठरली. गुलालविरहित मिरवणूक हे आणखी एक वैशिष्ट्य होते. त्याऐवजी फुले आणि भंडाऱ्याची उधळण भक्तांनी केली. दुपारी दोन ते सायंकाळी पाच या दरम्यान पावसाच्या हलक्या सरी गणेशभक्तांचा आनंद द्विगुणित करीत होत्या. मिरवणूक पाहण्यासाठी सायंकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. पिंपरीत सायंकाळी काही वेळ वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, क्षणार्धात पुन्हा वीजपुरवठा सुरळीत झाला. गणेश मंडळांनी अतिशय सुंदर पद्धतीने रथांची सजावट केली होती.
डी वॉर्ड फ्रेंड्स सर्कल मंडळाने तिरुपती बालाजीची भव्य प्रतिकृती केली होती. तर नेहरुनगर येथील राष्ट्रतेज मित्र मंडळाने दर वर्षीप्रमाणे जनजागृती करून मंडळाचे वेगळेपण जपले होते. त्यांनी व्यसनमुक्तीसंदर्भात संदेश देणारे फलक घेऊन गणेशभक्त प्रबोधन करीत होते. रात्री आठनंतर मिरवणुकीतील जोश वाढला. रात्री दहानंतर ढोल-ताशांचा दणदणाटाने वातावरणात चैतन्य निर्माण केले होते. रात्री बाराला पारंपरिक वाद्यांचा दणदणाट थांबला. त्यानंतर मंडळांनी शांततेत गणरायाला निरोप दिला. मध्यरात्री साडेबारापर्यंत मंडळांच्या वतीने विसर्जन करण्यात येत होते.
(प्रतिनिधी)

Web Title: Message to the people of 970 congregations in the Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.