एक मार्चपासून मेट्रोची रिटर्न तिकीट बंद होणार प्रवाशांचा मनस्ताप वाढणार
By अविनाश रावसाहेब ढगे | Published: February 22, 2024 09:59 PM2024-02-22T21:59:20+5:302024-02-22T21:59:30+5:30
मेट्रो प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.
पिंपरी : मेट्रो प्रशासनाने परतीच्या प्रवासाचे (रिटर्न) तिकीट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १ मार्च पासून ही सेवा बंद होणार आहे. मेट्रो प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना आता जाताना आणि येताना वेगळे तिकीट काढावे लागणार आहे. यात प्रवाशांचा वेळ वाया जाणार आहे. तसेच मनस्ताप देखील वाढणार आहे.
महामेट्रोने वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी चिंचवड ते सिव्हील कोर्ट असा ऑगस्टमध्ये मेट्रोचा विस्तार करण्यात आला. त्यानंतर मेट्रोची प्रवासी संख्या वेगाने वाढली. दिवसाला साधारण ५० ते ५५ हजार प्रवासी मेट्रोमधून प्रवास करत आहेत. प्रवाशांना मेट्रोतून प्रवास करण्यासाठी मेट्रोचे ऍप, व्हॉट्स ऍप क्रमांक, एटीव्हीएम मशीनच्या माध्यमातून तिकीट काढण्याची सोय आहे. तसेच, प्रत्येक मेट्रो स्थानकावर तिकीट काऊंटर आहे. या तिकीट काऊंटरवर सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेस तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागतात.
नागरिक प्रवासादरम्यान वेळ वाचावा म्हणून आणि दोनदा तिकीट काढण्यासाठी काऊंटरवर किंवा एटीव्हीएम मशीनवर जावून तिकीट काढण्यापेक्षा बरेच नागरिक एकदाच परतीचे (रिटर्न) तिकीट काढतात. पण, मेट्रो प्रशासनाने आता १ मार्च पासून रिटर्न तिकीट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रो प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना आता जाताना आणि येताना वेगळे तिकीट काढावे लागणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जाणार आहे. तसेच दोनदा तिकीट काढण्याची डोकेदुखी वाढणार आहे. मेट्रो प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.