Metro: पिंपरी-निगडी मेट्रोसाठी तीन वर्ष थांबा, तीन महिन्यांत निविदा
By विश्वास मोरे | Published: November 3, 2023 08:06 PM2023-11-03T20:06:58+5:302023-11-03T20:08:35+5:30
प्रवासी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न...
पिंपरी : पिंपरी ते निगडी पर्यंत मेट्रोसाठी मंजुरीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला आता. मंजुरीनंतर प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहेत. पुणेमेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड महापालिका या मार्गाचे विस्तारीकरण पुढे निगडी पर्यंत होणार आहे. या विस्तारित मार्गाचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) केंद्र शासनाने मंजूर केल्यानंतर येत्या तीन महिन्यात या मार्गाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू केले जाईल, अशी माहिती महामेट्रो व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांना चांगली कनेक्टिव्हिटी देण्यासाठी हे विस्तारीकरण आवश्यक होते. हा मेट्रो प्रकल्प शहराच्या दळवळणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात पिंपरी ते स्वारगेट या मेट्रो मार्गावर पिंपरी ते फुगेवाडी या दरम्यान पासून मेट्रो सेवा सुरू झाली. आता पिंपरी ते पुण्यातील सिव्हिल कोर्ट दरम्यान मेट्रो धावत आहे. पिंपरी पासून निगडी पर्यंत विस्तारीकरण व्हावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवडकरांची होती. मात्र, मागील दोन वर्षांपेक्षा अधिक काळ हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी प्रलंबित होता. त्यास सुमारे तीन वर्षांनी मुहूर्त सापडला. अखेर २३ ऑक्टोबर २०२३ रोजी केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी आवास मंत्रालयाने अंतिम मान्यता दिली. त्यामुळे निगडी पर्यंत मेट्रो विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. पिंपरी ते निगडी हा मार्ग ४.१३ किलोमीटर लांबीचा असणार आहे. त्यामुळे निगडी पर्यंत मेट्रो धावण्याचे शहरवासीयांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
प्रवासी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न...
पिंपरी ते स्वारगेट या मार्गावर पिंपरी ते सिव्हिल कोर्ट मेट्रो सेवा सुरू आहे. यामध्ये पिंपरी स्टेशनवरून अधिक प्रवासी संख्या आहे. परंतु, इतर स्टेशनवरून प्रवासी संख्या अत्यल्प आहे. सर्वच मेट्रो स्टेशनवरून प्रवासी संख्या कशी वाढेल ? जास्तीत जास्त शहरवासीयांना मेट्रो प्रवासाकडे आकर्षित करणे आणि त्यासाठी का करावे लागेल, याचा अभ्यास केला जात आहे. त्यानुसार सुधारणा करण्यात येत आहेत. महामेट्रो प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतेही दुर्लक्ष करणार नसून सर्व खबरदारी घेत आहोत.
- श्रावण हर्डीकर