उद्योगांचे स्थलांतर हा चुकीचा प्रचार; सुप्रिया सुळेंनी हिंजवडीची बदनामी थांबवावी, फडणवीसांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 03:20 PM2024-11-07T15:20:34+5:302024-11-07T15:21:22+5:30
महाविकास आघाडीच्या काळात सर्वाधिक उद्योग शहराबाहेर गेले आहेत
पिंपरी : हिंजवडीतील उद्योगांचे स्थलांतर होत आहे, असा चुकीचा प्रचार केला जात आहे. महाविकास आघाडीच्या काळात सर्वाधिक उद्योग शहराबाहेर गेले आहेत, ते राज्याबाहेर गेले नाहीत, त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंजवडीची बदनामी थांबवायला हवी. लोकसंख्यावाढीच्या तुलनेमध्ये पाणी आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. आपले सरकार पुन्हा आल्यानंतर पिंपरी-चिंचवडकरांना पाणी कमी पडू देणार नाही. वेगवेगळ्या धरणांतून पाणी आणले जाईल. महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना विजयी करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाकड येथे केले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ बुधवारी वाकड-काळेवाडी फाटा येथील मैदानावर सभा झाली. त्यावेळी फडणवीस बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, पिंपरी-चिंचवडच्या विकासामध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. त्यांच्या निधनानंतर आमदार अश्विनी जगताप यांनी उत्तम काम केले आणि त्यानंतर आता शंकर जगताप निवडणुकीमध्ये उतरले आहेत. विकासाचा आमदार म्हणून आपल्याला त्यांना निवडून द्यायचे आहे. पुनावळेतील कचरा डेपोचा प्रश्न आपण सोडवला आहे. पुण्याच्या परिसरामध्ये होणाऱ्या ३० हजार कोटींच्या रिंगरोडमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. त्याचा फायदा पिंपरी-चिंचवडकरांना होणार आहे.
महायुतीमुळे चिंचवड विकासाच्या वाटेवर : शंकर जगताप
शंकर जगताप म्हणाले की, महायुतीने मला संधी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघ विकसनशील आहे. त्याला विकासाच्या वाटेवर नेण्याचे काम गेल्या वीस वर्षांत महायुतीच्या नेत्यांनी केले आहे. त्यामुळेच ही सोनेरीनगरी उभी राहिली आहे. आमदार लक्ष्मणभाऊ गेल्यानंतर भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडला आधार दिला.