जरांगे-भुजबळ यांनी समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य टाळावीत- मंत्री उदय सामंत
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: December 23, 2023 04:18 PM2023-12-23T16:18:21+5:302023-12-23T16:21:27+5:30
इंद्रायणी-पवना नद्यांच्या टीपीआरचे काम सुरू...
पिंपरी :मराठा आरक्षणावरून दोन्ही समाजामध्ये दरी वाढवण्याचे काम सुरू आहे. मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांनी दोन्ही समाजातील तेढ करणारी वक्तव्ये टाळावीत, असे आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात शंभरावे मराठी नाट्यसंमेलन जानेवारी महिन्यात होणार आहे. या संमेलनाची तयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच मंडप पूजन करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत चिंचवड येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, आमदार उमा खापरे व शहरातील कलावंत तसेच संमेलनासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्यांच्या प्रतिनिधीं उपस्थित होते.
उदय सामंत म्हणाले, मराठा समाजाला टिकणारे आरक्षण गायकवाड समितीच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले ते आरक्षण दोन्ही न्यायालयात टिकले परंतु सरकार बदलल्या नंतर ते टिकवता आले नाही. सध्या इंपिरियल डाटा उपलब्ध नाही. उपलब्ध झाल्यास आम्ही टिकणारे आरक्षण देऊ. यासाठी विशेष अधिवेशन देखील बोलावणार आहे. तर मनोज जरांगे आणि नेते छगन भुजबळ यांनी दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही अशी विधाने करू नका असे आवाहनही त्यांनी केले. तसेच तर ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
इंद्रायणी-पवना नद्यांच्या टीपीआरचे काम सुरू...
इंद्रायणी पवना नद्यांच्या प्रदूषणांवर उपाययोजना तसेच नदी सुधारसाठी टीपीआर करण्यात येत आहे. या प्रकल्पाला दोन हजार कोटी खर्च आहे. हा प्रकल्प पीएमआरडीए, महापालिका आणि राज्य सरकार असा संयुक्तपणे करण्यात येणार आहे. तीन वर्षांत काम पूर्ण होणार असल्याचेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.