हौसेसाठी दुचाकी चोरणारा अल्पवयीन चोरटा जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 06:44 PM2020-03-06T18:44:50+5:302020-03-06T18:46:17+5:30
दोन लाख ४५ हजारांच्या पाच दुचाकी जप्त
पिंपरी : हौसेखातर दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला जेरबंद करण्यात आला आहे. त्याच्याकडून दोन लाख ४५ हजारांच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. पिंपरी पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहननगर, चिंचवड येथून १० दिवसांपूर्वी एक दुचाकी चोरीला गेली होती. त्याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा पिंपरी पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. टेल्को रोड, चिंचवड येथे एक मुलगा लाल काळ्या रंगाच्या दुचाकीवर आला आहे. त्या दुचाकीला क्रमांक नसून ती चोरीची आहे, अशी माहिती पिंपरी पोलिसांच्या तपास पथकातील पोलीस हवालदार अनिल गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता त्याच्याकडे असलेली दुचाकी त्याने १० दिवसांपूर्वी मोहननगर, चिंचवड येथून चोरल्याचे सांगितले. तसेच आणखी चार दुचाकी चोरल्याचे देखील त्याने सांगितले.
पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख ४५ हजारांच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील दोन, पिंपरी, देहूरोड आणि हडपसर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक निमगिरे, पोलीस कर्मचारी अनिल गायकवाड, राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, जावेद बागसिराज, श्रीकांत जाधव, प्रतिभा मुळे, शहाजी धायगुडे, उमेश वानखेडे, रोहित पिंजरकर, रमेश दोरताले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.