पतंगाचा मांजा अडकून स्फोट
By admin | Published: January 26, 2017 12:27 AM2017-01-26T00:27:02+5:302017-01-26T00:27:02+5:30
पडवळनगर, थेरगाव येथील प्रजापती चाळीत घराच्या टेरेसवरून पतंग उडवताना मांजा उच्च दाबाच्या वीजवाहक तारांमध्ये अडकला
पिंपरी : पडवळनगर, थेरगाव येथील प्रजापती चाळीत घराच्या टेरेसवरून पतंग उडवताना मांजा उच्च दाबाच्या वीजवाहक तारांमध्ये अडकला. अतिउच्च दाबाच्या विद्युतवाहक तारांच्या ठिकाणी मोठा स्फोट झाला. त्या स्फोटाच्या ठिणग्या उडून त्यात तीन मुले भाजून जखमी झाली. त्यातील अक्षय प्रजापती हा ११ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर पुण्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अक्षय, आर्यन पांडे व आकाश हे तिघे सकाळी ११च्या सुमारास घरासमोरील टेरेसवरून पतंग उडवत होते. मांजा इमारतीवरून जाणाऱ्या उच्च दाबाच्या वीजवाहक तारांमध्ये अडकला. त्यामुळे त्या ठिकाणी मोठा स्फोट झाला. त्यात अक्षयसह दोन मुले जखमी झाली आहेत. अक्षय गंभीर भाजल्याने त्याला तातडीने पुण्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मांजा अडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. तसेच मांज्यामुळे कापून जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु पतंगाच्या मांज्याने विद्युततारांचा स्फोट होऊन दुर्घटना घडण्याची ही पहिलीच घटना आहे.
तीन मुले भाजून जखमी झाली. शिवाय चाळीतील काही रहिवाशांच्या घरातील विद्युत मीटरही जळाले. दूरचित्रवाणी संच, तर काहींच्या इतर विद्युत उपकरणांचे नुकसान झाले. काहींच्या घरातील साहित्य खाक झाले. घरासमोर सुकविण्यासाठी घातलेले कपडे, गाद्या, त्याचबरोबर इमारतीतील सर्व सदनिकांचे विद्युत मीटर जळाले. तीन वर्षांपूर्वी थेरगाव, डांगे चौकात अशीच दुर्घटना घडली होती. टीव्ही केबल विद्युत खांबावरून नेल्याने शॉर्टसर्किट होऊन ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत एक मुलगा दगावला होता. (प्रतिनिधी)