आश्रमातून मुली झाल्या बेपत्ता, पिंपरीत दोन तर भोसरीमध्ये घडली एक घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 01:36 AM2019-02-21T01:36:05+5:302019-02-21T01:36:51+5:30
अपहरण : पिंपरीत दोन तर भोसरीमध्ये घडली एक घटना
पिंपरी : पिंपरीतून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले आहे, तर पिंपरीतील भाटनगर येथून १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भोसरीतून १६ वर्षांच्या मुलीला कोणीतरी अज्ञाताने फूस लावून पळवून नेले आहे. दोन दिवसांत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या तीन घटना घडल्या असून, भोसरीतून एका १६ वर्षांच्या मुलाचेसुद्धा अज्ञाताने अपहरण केले आहे. एकाच वेळी घडलेल्या अपहरणाच्या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतून मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फूस लावून १७ वर्षांच्या मुलीला पळवून नेले, तर भाटनगर येथे गॅस सिलिंंडरचे वाहन आले, ते पाहण्यासाठी घराबाहेर पडलेली १७ वर्षांची तरुणी पुन्हा घरी परतली नाही. कोणीतरी तिला आमिष दाखवून पळवून नेले आहे. ही मुलगी महिला मंडळ संचालित स्वाधार केंद्रात राहण्यास होती. कोणीतरी अज्ञाताने तिला फूस लावून पळवून नेले आहे. दापोडीतील सरस्वती अनाथाश्रमातून मंगळवारी १२ वर्षे वयाच्या मुलाचे अपहरण झाले आहे.
अपहरणाच्या वाढत्या घटनांमध्ये परिसरामध्ये चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांनी आरोपींचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी परिसातील नागरिकांमधून होत आहे.
बेपत्ता होण्याचे वाढले प्रमाण
आश्रमात वास्तव्यास असलेल्या मुली सद्य:स्थितीत सुरक्षित नसल्याचे निदर्शनास आले आहे. दोन महिन्यांपूर्वी भोसरीतील शासकीय वसतिगृहातून दोन मुली बेपत्ता झाल्याची घटना घडली. त्यानंतर चिंचवडगावातील गुरूकुल या आश्रमातून दोन मुली बेपता झाल्याची घटना घडली आहे. आता अपहरण झालेल्या दोन मुली दोन वेगवेगळ्या आश्रमात राहण्यास होत्या. आश्रमातून मुलींचे अपहरण झाल्याच्या घटनेने शहरात चिंतेचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.