शाळेत न जाता बेपत्ता झालेली मुले अखेर सापडली; निगडीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 03:18 PM2017-12-08T15:18:03+5:302017-12-08T15:20:35+5:30
शाळेत शिकणारे पाचवीतील चार विद्यार्थी सकाळी शाळेत स्कूल बस मधून आली आणि शाळेत न जाताच बेपत्ता झाले होते. ११.००च्या दरम्यान ही मुले प्राधिकरण सेक्टर २८, संत ज्ञानेश्वर उद्यान जवळ सापडली.
रावेत : वाल्हेकरवाडी आणि जांबे येथील रहिवासी व निगडी प्राधिकरणातील एका शाळेत शिकणारे पाचवीतील चार विद्यार्थी सकाळी शाळेत स्कूल बस मधून आली आणि शाळेत न जाताच बेपत्ता झाले होते. सकाळी साडेसहा वाजता शाळेत जाण्यासाठी घरातून निघाले होते. प्रत्यक्षात ते शाळेत गेले परंतु वर्गात गेले नाही, ही बाब शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शालेय प्रशासनास तातडीने माहिती दिली त्यानंतर शालेय प्रशासनाने तातडीने शोध मोहीम हाती घेतली.
सकाळी ७.३० च्या दरम्यान आकुर्डी येथील शाळेतील प्राथमिक वर्गातील ४ मुले, वर्गात न बसताच निघून गेली. शालेय प्रशासनाच्या ही बाब त्वरित लक्षात आली. सर्व मुले १० ते ११ वर्षीय असल्याने तत्काळ शोध घेत शाळेच्या स्कूल व्हॅनचा चालक विद्यार्थ्यांना शोधत प्राधिकरणातील संत ज्ञानेश्वर उद्यानात आल्यावर येथे फेरफटका मारणारे नागरी कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी त्यांच्या कडे चौकशी केली, तेव्हा त्यांनी सांगितले, की चार शाळकरी मुले वर्गात न जाता शाळेपासून निघून गेली आहेत. या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पाटील यांनी समितीच्या सदस्यांना फोन वरून कळविले व तत्काळ शोध मोहीम सुरू केली. बस चालक, शिक्षक आणि प्राधिकरण नागरी सुरक्षा सामितीचे कार्यकर्ते शोधाशोध करू लागले. अखेर ११.००च्या दरम्यान ही मुले प्राधिकरण सेक्टर २८, संत ज्ञानेश्वर उद्यान जवळ सापडली आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. या मुलांना जवळ घेऊन त्यांना बोलते केले. तेव्हा वेगवेगळी कारणे या विद्यार्थ्यांनी सांगितली. ही मुले सुखरूप पणे शालेय प्रशासनाकडे सुपूर्त केली. अखेर सर्वांचा जीव भांड्यात पडला.
या प्रसंगी प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी पालकांनी आणि शालेय प्रशासनानेसुद्धा दक्ष राहणे आवश्यक आहे, मुले हरवणे किंवा निघून जाणे या बाबत सर्व शालेय प्रशासनाने तसेच शासकीय प्रशासनाने गांभिर्याने घेतले पाहिजे. या बाबत विशेष प्रबोधन आणि दक्षता आवश्यक आहे.