आमदार-खासदारांनी पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रम घेण्याचे धाडस करू नये; मराठा समाज आक्रमक
By प्रकाश गायकर | Published: October 26, 2023 07:19 PM2023-10-26T19:19:56+5:302023-10-26T19:20:57+5:30
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहरात मराठा बांधवांचे साखळी उपोषण सुरू
पिंपरी : मराठा समाजास आरक्षण दिल्याशिवाय मंत्री, आमदार व खासदार यांनी पिंपरी चिंचवड शहरात कार्यक्रम घेण्याचे धाडस करू नये, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी देण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहरात मराठा बांधवांचे साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा गुरूवारी (दि. २६) दुसरा दिवस होता.
उपोषणस्थळी मोठ्या संख्येने उपस्थित राहत मराठा बंधू भगिनी व इतर समाजाच्या संस्था संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. उपोषणस्थळी कामगार नेते कैलास कदम, कामगार नेते काशिनाथ नखाते, हरीष मोरे, मारुती भापकर, सुभाष साळुंखे, अरूण पवार, गौतम चाबुकस्वार, मनोज गरबडे, राजाभाऊ गोलांडे, विलास भालेकर, कल्पना गिड्डे, विष्णुपंत तांदळे, राजेंद्र कुंजीर, उदयसिंह पाटील आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची उपोषण स्थळी बैठक झाली. यावेळी मराठा समाजास कायमस्वरूपी टिकाऊ आरक्षण दिल्याशिवाय कोणत्याही आमदार, खासदार व मंत्र्यांनी शहरात जाहीर कार्यक्रम घेऊ नये अन्यथा हा कार्यक्रम मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संविधानिक मार्गाने उधळण्यात येईल असा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला.
आंदोलनात फूट पाडण्याचा सरकारचा इरादा
सरकार मराठा समाजाच्या मागणीबाबत टाळाटाळ करत आहे. हे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न करत आहे. आंदोलनात फूट पाडण्याचा सरकारचा इरादा आहे अशा तीव्र स्वरूपाच्या भावना उपस्थितांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या.