सोशल मीडियावर 'डान्स'मुळे आमदार महेश लांडगे ट्रोल; आळंदीत साधेपणाने उरकला कन्येचा विवाह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 09:47 PM2021-05-31T21:47:45+5:302021-05-31T22:14:49+5:30
कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महेश लांडगे यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांचा मुलीच्या मांडव डहाळा कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रोल झाला. त्यामुळे लग्नाची नियोजित तारीख लांब असतानाच आळंदीत मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत आज साधेपणाने विवाह सोहळा केला. तर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पन्नास जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
भाजपचे शहराध्यक्ष आणि भोसरीचेआमदार महेश लांडगे यांची मुलगी साक्षी आणि रावेत येथील नंदकुमार भोंडवे यांचा मुलगा निनाद याांचा विवाह येत्या सहा जूनला करण्याचे नियोजन केले होते. त्यानिमित्ताने रविवारी भोसरी गावातील लांडगे आळीमध्ये रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास निमित्ताने मांडव डहाळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कन्या साक्षी हिची बैलगाडीतून मिरवणूक काढली होती. बैल गाडीचं सारथ्य चुलते सचिन लांडगे करीत होते. बैलगाडी घराजवळ आली असताना कार्यकर्त्यांनी भंडाऱ्याची उधळण केली. तसेच हलगी वादन सुरू झाले. यावेळी कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार हलगीच्या तालावर कार्यकर्त्याबरोबर ताल धरला. यावेळी उपस्थितांनीही आनंदात सहभाग घेतला. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर टीका झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जाहीर कार्यक्रमांना बंदी असताना आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मांडव डहाळा मिरवणुक आयोजित करणे योग्य होते का? अशी मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. आता पोलीस कारवाई करणार का? असा प्रश्नही उपस्थित झाला होता.
पुणे : भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगेंनी धरला हलगीच्या तालावर 'ठेका', सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल pic.twitter.com/rhhNC279nI
— Lokmat (@MiLOKMAT) May 31, 2021
दरम्यान हा विवाह सोहळा ६ जून राजस्थान किंवा गोवा येथे होणार होता. मात्र, लॉकडाउन वाढविल्याने सोमवारी सकाळीच आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीसमोर दर्शन घेऊन घरातील लोकांच्या उपस्थितीत विवाह पार पडला.
सचिन लांडगे म्हणाले, ‘‘मांडव डहाळे समारंभासाठी महापालिका प्रशासनाकडून रितसर परवानगी घेतली होती. नियमानुसार २५ मोजक्या आप्तेष्ठांना निमंत्रित केले होते. कौटुंबिक कार्यक्रमात आम्ही आनंद साजरा केला. मात्र, समारंभ ठिकाणी काही कार्यकर्ते, हितचिंतक उपस्थित राहीले. त्यामुळे गर्दी निर्माण झाली. कोरोना नियमावली अर्थात सोशल डिस्टंन्सींगच्या नियमाचे उल्लंघन झाले. याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पोलीस प्रशासनाने केलेली कारवाई योग्य आहे. प्रशासनाने केलेल्या दंडात्मक कारवाईची पूर्तता आम्ही करणार आहोत. प्रशासनाला सहकार्य करणे हे आमचे कर्तव्य आहे.’’