शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार महेश लांडगे यांच्याकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 11:27 AM2023-06-15T11:27:29+5:302023-06-15T11:27:48+5:30
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून नुकतीच लोकसभा निवडणूकप्रमुखांची घोषणा
पिंपरी : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच लोकसभा निवडणूकप्रमुखांची घोषणा केली. त्यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार लांडगे यांच्याकडे सोपवली. त्यानंतर पहिल्यादाच आमदार लांडगे हे शिरूर लोकसभेतील सर्व विधानसभाप्रमुखांसह श्रीक्षेत्र ओझर येथील विघ्नहर गणेश मंदिरात दर्शनाला गेले. त्यामुळे महेश लांडगे यांनी शिरूर लोकसभेच्या प्रचाराचा श्रीगणेशा केल्याची चर्चा सुरू झाली.
भाजपच्या श्रेष्ठींनी संधी दिली, तर शिरूर लोकसभा लढविण्यासाठी तयारी असल्याचे सुतोवाच महेश लाडंगे यांनी केले होते. त्यानंतर ओझरच्या विघ्नहर्ताच्या दर्शनासाठी जुन्नर विधानसभा निवडणूकप्रमुख आशा बुचके, भोसरी विधानसभा निवडणूकप्रमुख विकास डोळस, हडपसर विधानसभा निवडणूकप्रमुख योगेश टिळेकर, खेड विधानसभा निवडणूकप्रमुख अतुल देशमुख, शिरूर-हवेली विधानसभा निवडणूकप्रमुख प्रदीप कंद, लोकसभा समन्वयक ॲड. धर्मेंद्र खांडरे आदींना घेऊन ते गेले.
याविषयी आमदार लांडगे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त विधानसभा निवडणूकप्रमुखांची ओझर येथे बैठक झाली. आगामी काळात पक्ष संघटन आणि निवडणूक नियोजनाबाबत चर्चा केली. मतदारसंघनिहाय मोर्चेबांधणी करून भाजपाच्या विचाराचा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला.