आमदार महेश लांडगे यांची पिंपरी -चिंचवड भाजपा शहराध्यक्षपदी बिनविरोध निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 03:09 PM2020-01-16T15:09:22+5:302020-01-16T15:13:45+5:30
आमदार लक्ष्मण जगताप यांचा अध्यक्षपदासाठी असणारा कालखंड पूर्ण झाल्याने तीन महिन्यांपासून कोण अध्यक्ष होणार याबाबत चर्चा सुरू होती..
पिंपरी : विधानसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडलेली भाजपा शहराध्यक्ष निवड आज जाहिर झाली. एकमेव अर्ज आल्याने भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची बिनविरोध निवड प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहिर केली.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील काही शहरांचे अध्यक्ष निवडले गेले. मात्र, पिंपरी-चिंचवडची निवड झाली नव्हती. आमदार लक्ष्मण जगताप यांचा अध्यक्षपदासाठी असणारा कालखंड पूर्ण झाल्याने तीन महिन्यांपासून कोण अध्यक्ष होणार याबाबत चर्चा सुरू होती. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षीय पातळीवरील निवडणूक प्रक्रिया सुरू होती. अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी आमदार लांडगे यांचा एकमेव अर्ज आला. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी लांडगे यांची बिनविरोध निवड जाहिर केली.
यावेळी माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे, माजी शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा ढोरे, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, लोक लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, पक्षनेते एकनाथ पवार, उपमहापौर तुषार हिंगे, निवडणूक अधिकारी मोरेश्वर शेडगे, प्रदेशच्या उमा खापरे, सरचिटणीस अमोल थोरात, श्ैला मोळक, रवी लांडगे, महेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
लोकमतचे वृत्त ठरले खरे
भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी शहराध्यक्ष पद दोन्ही आमदारांपैकी एकाने भूषवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. शहरातील दोन आमदारांपैकी जगताप यांनी एकदा पद भूषविल्याने ते पुन्हा हे पद भूषविण्यासाठी उत्सुक नव्हते. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांची मते चंद्रकांत पाटील यांनी जाणून घेतली. त्यावेळी आमदार महेश लांडगे यांनीच पद भूषवावे, अशी अनेकांनी मते मांडली. याबाबतचे भाजपाच्या शहराध्यक्षपदी महेश लांडगे असे वृत्त सर्वप्रथम लोकमतने प्रसिद्ध केले होते. लोकमतचे वृत्त खरे ठरले आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले, पक्षाने सोपविलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. संघटनवाढीबरोबरच महापालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास साधण्याचा प्रयत्न करणार आहे.