पिंपळे गुरवमध्ये खोदकाम सुरू असताना 'एमएनजीएल'ची पाईपलाईन फुटली; गॅस गळती होऊन आगीची दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 08:02 PM2021-07-31T20:02:25+5:302021-07-31T20:05:34+5:30
नशीब बलवत्तर होते म्हणून थोडक्यात दुर्घटना टळली...
पिंपळे गुरव : येथील रामकृष्ण चौकातील रस्त्यावरील शिवदत्त नगर येथे जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू होते. एमएनजीएलच्या पाईपलाईनला घाव लागला. त्यामुळे पाईपलाईनमधून गॅस गळती होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली. ही घटना शनिवारी घडली. या वेळी येथून दुचाकी वाहन जात असताना अचानक आगीच्या ज्वाला अंगावर आल्याने दुचाकीवरून दोघे जण कोसळले. यावेळी दुचाकी वाहन चालविणाऱ्यांच्या डोक्याला हाताला भाजले होते. दुचाकीच्या मागे महिला बसली होती. नशीब बलवत्तर होते म्हणून थोडक्यात दुर्घटना टळली, अन्यथा जीव गेला असता. दुचाकी वाहन खड्डयात गेल्यामुळे त्यानेही पेट घेतला. यामध्ये दुचाकी वाहन जळून अक्षरशः खाक झाली.
परिसरातील `ड` प्रभाग अध्यक्ष सागर अंघोळकर, स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, तानाजी जवळकर यांनी अग्निशामक दलाला तसेच एमएनजीएलच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करून कळविले. यावेळी वल्लभनगर, रहाटणी येथील अग्निशामक दलाचे वाहने घटनास्थळी काही वेळातच दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी येथील त्वरित आग आटोक्यात आणली. परिसरातील नागरिक यावेळी भयभीत झाले होते.
महापालिकेच्या वतीने ठेकेदाराकडून येथील रस्त्याकडेला पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास जेसीबीचा घाव एमएनजीएलच्या पाईप लाईनला लागला. यावेळी गॅस गळती होऊन आग लागली. आगीच्या ज्वाला पेट घेत असताना गॅस लाईन मधून गॅस लाईन सुरू असल्याने आणखी तीव्र ज्वाला भडकत होत्या. यावेळी नागरिकांनी दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी रस्ते बंद केला होता. पिंपळे गुरव परिसरातील गेल्या तीन महिन्यात ही सातवी घटना आहे.
यावेळी वल्लभनगर येथील अग्निशामक दलातील सिनियर फायरमन शिवलाल झनकर, विशाल फडतरे, संजय महाडिक, विकास भोंगाले, सिद्धेश दरवेस, संकेत कुंभार, स्मिता गौरकर, दर्शना पाटील तसेच रहाटणी येथील सिनिअर फायरमन अशोक पिंपरे, दत्तात्रय रोकडे, हनुमंत होले, विशाल पोटे, ओंकार रसाळ आदी फायरमन जवानांनी येथीलआग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
वेळोवेळी अशा घटना घडून येत आहेत. महापालिकेचे संबंधित अधिकारी, ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर यांनी घडलेल्या दुर्घटनेची नुकसानभरपाई द्यावी. तसेच दुर्घटनेत जळून खाक झालेले वाहनाची देखील भरपाई संबंधित व्यक्तीला देण्यात यावी.
महेश जगताप, स्वीकृत नगरसेवक
पाषाण येथून महेंद्र बानवलीकर (वय ५२), स्मिता बानवलीकर (वय ४७) दुचाकीवरून पिंपळे गुरव येथे आले असताना घटनास्थळी अचानक आग लागून ज्वाला अंगावर आल्याने जमिनीवर कोसळले. यामध्ये महेंद्र बानवलीकर यांना डोक्याला हाताला भाजले. दुचाकी घसरून खड्ड्यात गेली. त्याआगीतच डिओ दुचाकी वाहन क्रमांक एम एच १२ एच पी ४०४५ जळून खाक झाले. अशी माहिती महेंद्र बानवलीकर यांचे थोरले बंधू नरेंद्र बानवलीकर यांनी दिली अगदी घराजवळ येताच बंधू सोबत दुर्घटना घडून आल्याचे त्यांनी सांगितले.