पिंपरीतील मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या आवळणार; पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 08:24 PM2021-08-23T20:24:30+5:302021-08-23T20:24:47+5:30
चोरीच्या मोबाईलची विक्री करणारे पोलिसांच्या रडारवर; मास्टर माईंडला देखील बेड्या ठोकणार
पिंपरी : शहरात मोबाइल हिसकावून तसेच घरातून चोरी केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये १५ गुन्हे दाखल झाले. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यातील चोरांच्या मुसक्या आवळून मास्टर माईंडला देखील बेड्या ठोकण्यात येतील. तसेच चोरीच्या मोबाईलची विक्री करणाऱ्यांवर देखील कारवाई येईल, असा इशारा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलाय.
शहरातील कामगार, पाचदारी, महिला, जेष्ठ नागरिक यांच्या हातातून मोबाईल हिसकावून नेण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्याबाबत विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे देखील दाखल होत आहेत. पोलिसांनी काही गुन्ह्यांची उकल करून त्यातील चोरट्यांना पकडले. मात्र तरीही मोबाईल चोरीचे तसेच वाहनचोरीचे सत्र शहरात सुरूच आहेत.
कृष्ण प्रकाश याबाबत म्हणाले, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत शहरात वाहन किंवा मोबाईल चोरीच्या घटना कमी झाल्या आहेत. तसेच याप्रकरणी तपास करून गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. अशा काही चोरट्यांना पकडल्यानंतर त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला जातो. यात चोरी केलेल्या वाहन किंवा मोबाईलच्या मालकांनी पोलिसांकडे तक्रार केले नसल्याचे काही प्रकरणांमध्ये समोर येत आहे. त्यामुळे संबंधित वाहनधारक किंवा मोबाईल धारकांचा पोलिसांकडून शोध घेतला जातो. त्यानंतर त्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जातो. मोबाईल, वाहन किंवा इतर चोरीच्या प्रकरणांत नागरिकांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे. त्यामुळे शोध घेणे अधिक सोपे होईल.
चोरीचे मोबाईल जातात कुठे?
चोरट्यांनी हिसकावलेले तसेच चोरलेले मोबाईल फोन जातात कुठे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जुन्या मोबाईलला शहरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. याचा गैरफायदा घेऊन चोरीचे मोबाईल विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.