आधुनिक युगात बहुरूपी आर्थिक विवंचनेत
By admin | Published: May 22, 2017 04:59 AM2017-05-22T04:59:00+5:302017-05-22T04:59:00+5:30
विविध रूपे घेऊन गावोगावी लोकांचे मनोरंजन करून समाजप्रबोधन करणारे बहुरूपी आता काळाच्या पडद्याआड जाण्याच्या मार्गावर आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
रावेत : विविध रूपे घेऊन गावोगावी लोकांचे मनोरंजन करून समाजप्रबोधन करणारे बहुरूपी आता काळाच्या पडद्याआड जाण्याच्या मार्गावर आहेत. बहुरूपी या कलेची होणारी उपेक्षा आणि समाजाकडून न मिळणारा मानसन्मान यामुळे बहुरूप्यांवर आता भीक मागण्याची वेळ आली आहे. ही लोककला टिकविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे. सुमारे २५-३० वर्षांपूर्वी सोंग घेऊन बहुरूपी गावात येत होता. कधी पोलीस तर कधी विविध सोंगे बहुरूपी घेत होता. या सोंगांमुळे अनेकांची भंबेरी उडायची. जसे सोंग तसाच आवाज आणि रूबाबही असायचा. पोलिसांच्या वेशात आलेले बहुरूपी तर हुबेहुब पोलीसच वाटायचे. दारात पोलीस पाहून अनेकांची पाचावर धारण बसायची. हनुमान, वाघ तर कधी पोटात सुरा खुपसलेल्या अवस्थेतील आणि विविध मुखवटे धारण केलेले बहुरूपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे मनोरंजन करायचे. आपल्या विशिष्ट लयकारीत बोलून तो घरधन्याचे मन जिंकून घ्यायचा आणि तोही बहुरूप्याला धान्य, कपडे, पैसे असे मुक्तहस्ते देत होता. परंतु आता काळ बदलला आणि समाजाची मनोरंजनाची साधनेही बदलली. बहुरूपी हा टिंगल टवाळीचा विषय झाला. कुणी त्यांना पैसेही द्यायला तयार नाही. या कलेच्या नावावर अनेकांना आता भीक मागण्याची वेळ आली आहे. नवीन पिढीला तर बहुरूपीच माहीत नाही. आज अनेक वयोवृद्ध बहुरूपी गत काळातील आठवणी आणून डोळ्यात पाणी आणतात. शासनाने या बहुरूप्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी आहे. एकेकाळी वर्षभर गावात फिरून ग्रामस्थांची करमणूक करणारा बहुरूपी हल्ली शहरातील विविध उपनगरात उपजीविकेसाठी फिरताना दिसत आहेत. रावेत, वाल्हेकरवाडी या परिसरात घराबाहेर एखाद्याची फिरकी घेत गंमत करणारे बहुरूपी फिरत आहेत. बीड, उस्मानाबादसह मध्य प्रदेशातील हे बहुरूपी नागरिकांचे मनोरंजन करीत असल्याने ते लहान मुलांचेही आकर्षण झाले आहेत. पोलीस बनून आलेल्या या बहुरूपी आपल्या भागातील एका माणसाशी पोलीस हुज्जत घालत आहे़ हे बघून ज्यांनी या बहुरूपीला ओळखले नाही ते गंभीर होतात. एकेकाळी गावागावांत लोकप्रिय ठरलेला बहुरूपी हा कलाप्रकार आता दुुर्मीळ होत चालला आहे. नवीन पिढीला हा प्रकार माहिती नसल्याने त्यांना बघून लहान मुले आधी घाबरतात. नंतर तेही या बहुरूपीबरोबरच्या गमतीशिर गप्पांमध्ये सहभागी होतात.
रावेत व परिसरातील गल्लीबोळात गेल्या काही दिवसांपासून असे मनोरंजन सुरू आहे. प्राचीन काळापासून बहुरूपी जमातीचं अस्तित्व आहे. बहुरूपी भटके, अस्थिर असले तरी ते प्राचीन काळी समाजकारणात- राजकारणात महत्त्वाच्या भूमिका बजावत होते़ त्यांना त्यांचा इतिहास आहे. हजारो वर्षांची परंपरा आहे.
श्रीपती भट्टाच्या ‘जोतिष रत्नमाला’ या प्रसिद्ध ग्रंथात यांचा उल्लेख आहे. आधुनिक काळात विज्ञानाच्या वाढीबरोबर करमणुकीची साधनं वाढली. शिवाय ती घराघरात उपलब्ध झाली. काळाची मानसिकताही बदलली. त्यामुळे बहुरूपींचा हा परंपरागत व्यवसाय उपजीविकेसाठी कमकुवत ठरत
आहे.