आधुनिक पद्धतीने बुजविले खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 11:50 PM2018-07-19T23:50:17+5:302018-07-19T23:52:11+5:30
आधुनिक पद्धतीच्या यंत्राच्या साहाय्याने बुजविलेल्या खड्ड्याला तीन वर्षांची वैधता आहे.
जाधववाडी : मुख्य स्पाईन रस्त्यावरील जाधव सरकार चौकात खड्डे एका विशिष्ट प्रकारच्या यंत्राच्या साहाय्याने बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले. आधुनिक पद्धतीच्या यंत्राच्या साहाय्याने बुजविलेल्या खड्ड्याला तीन वर्षांची वैधता आहे. तीन वर्षांदरम्यान हा खड्डा
उखडल्यास पुन्हा संबंधित ठेकेदारामार्फत नव्याने तो बुजविण्यात येणार आहे. यंत्राची एकवेळची क्षमता २०० चौरस मीटरपर्यंतचा परिसर इतकी आहे.
आधुनिक पद्धतीने खड्डे बुजविण्याची दोन यंत्रे महापालिकेकडे आहेत. तिसरे यंत्रही लवकरच घेणार आहे. हे नवीन तंत्र विकसित करण्याची जागा भोसरी येथील लांडगेनगरजवळ तयार करण्यात आली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता महेश बिरदे यांनी दिली.
महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय घुबे, उपअभियंता महेश बिरदे, शाखा अभियंता जयवंत जाधव, कनिष्ठ अभियंता अनिल गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम प्रभाग दोन येथे सुरू आहे. नगरसेवक राहुल जाधव यांनी कामाची पाहणी केली.
स्पाईन रस्त्यावरील सेवा मार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली आहे. दोन मशिन मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविणार व नंतर अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविणार, अशी माहिती शाखा अधिकारी जयवंत जाधव यांनी दिली.
‘कोल्ड ईमल्शन’चा वापर
आधुनिक पद्धतीत कोल्ड ईमल्शन म्हणजेच एक विशिष्ट पद्धतीचे थंड डांबर वापरले जाते. एखाद्या खड्ड्यात पावसाचे थोड्या प्रमाणात साचलेले पाणी असेल, तर सुरुवातीला एअर ब्लोअरने सर्व पाणी काढले जाते. नंतर खड्ड्यात खडी भरून कोल्ड ईमल्शन टाकून धुमस फिरविला जातो. बांधकामात वापरली जाणारी थोडी डस्ट टाकून पुन्हा त्यावर धुमस फिरवला जातो.