Pimpri Chinchwad: शिक्षण मंडळाच्या माजी सभापतीसह चौघांवर विनयभंगाचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 08:09 PM2023-06-15T20:09:03+5:302023-06-15T20:09:52+5:30
पिंपरी आणि लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ मे ते ४ जून २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला...
पिंपरी : नोकरीसाठी परराज्यातून आलेल्या तरुणीचा विनयभंग केला. या प्रकरणी शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल झाला. पिंपरी आणि लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ मे ते ४ जून २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला.
पश्चिम बंगाल येथील पीडित २८ वर्षीय तरुणीने आलेल्या एका बुधवारी (दि. १४) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, महेश्वरी रेड्डी, चिरागउद्दीन शेख, महिला आरोपी (तिघेही रा. कोंढवा, पुणे) आणि अर्जुन ठाकरे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कामाच्या शोधात होती. तिला वेबसाइटवरून एका महिलेचा नंबर मिळाला. महिलेने तरुणीला बँकेत नोकरीसाठी इंटरव्यू असल्याचे सांगून पुण्यात येण्यास सांगितले. त्यानंतर बँकेत नोकरीसाठी वेळ लागणार असल्याचे सांगून इतर नोकरीसाठी अर्जुन ठाकरे यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले. त्यानंतर ठाकरे याने चिरागउद्दीन शेख, महिला आरोपी आणि महेश्वरी रेड्डी यांच्याशी पीडित तरुणीची ओळख करून दिली.
दरम्यान, १५ मे रोजी तरुणीला आरोपींनी पुण्यातील कार्यालयात बोलविले. तेथे ठाकरे याने तिचा विनयभंग केला. त्यानंतर रेड्डी याने वारंवार पुणे आणि पिंपरी येथील कार्यालयात विनयभंग केला. ३ जून रोजी पुण्यातील कार्यालयातील स्वच्छतागृहात रेड्डी याने तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. आम्ही देखील वेगवेगळ्या मुली रेड्डी याला दिल्या आहेत. तू देखील त्यांना खूश कर, असे महिला आरोपीने पीडित तरुणीला सांगितले. तसेच चिरागउद्दीन याने पिस्तुलचा धाक दाखवून पीडित तरुणीला धमकावले. त्यानंतर ४ जून रोजी रेड्डी याने तरुणीला व्हिडिओ कॉल करून अश्लील चाळे केले, असे फिर्यादीत नमूद आहे.