कंपनीतील वरिष्ठाकडून महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 05:40 PM2020-03-01T17:40:47+5:302020-03-01T17:52:13+5:30
कामावरून काढून टाकण्याची भीती दाखवून केला विनयभंग
पिंपरी : शरीरसुखाची मागणी करून कर्मचारी महिलेला फिरायला येण्यास सांगितले. तसेच कामावरून काढून टाकण्याची भीती दाखवून विनयभंग केला. प्राधिकरण निगडी येथे ऑक्टोबर २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत हा प्रकार घडला.
याप्रकरणी ३१ वर्षीय कर्मचारी महिलेने शनिवारी (दि. २९) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अभय नरवडेकर (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला प्राधिकरण निगडी येथील एका कंपनीतील कर्मचारी आहे. तर आरोपी प्रोजेक्ट हेड आहे. फिर्यादी महिला आरोपी याच्याकडे कामाचे रिपोर्टींग करत. तू मला खूप आवडतेस, आपण दोघे फिरायला जाऊ, असे म्हणून आरोपी शरीरसुखाची मागणी करीत असे. बाहेर फिरायला जाऊ, जेवण करू, असे म्हणून महिलेला त्रास देत असे. तसेच कामावरून काढून टाकण्याची महिलेला भिती दाखवित असे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.