महापालिका कर्मचाऱ्यांना वेतनासह सानुग्रह अनुदान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 04:39 PM2018-10-17T16:39:55+5:302018-10-17T16:42:29+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रथा बोनस देण्याची पद्धत आहे. महापालिकेत साडेसात हजार अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत.
पिंपरी : दिवाळी जवळ आली असून औद्योगिक नगरीतील विविध कंपन्यांनी बोनस जाहीर केले आहेत. महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे. एक महिन्याच्या वेतनासह पंधरा हजार रूपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे, या संदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी लेखा विभागाला निर्देश दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रथा बोनस देण्याची पद्धत आहे. महापालिकेत साडेसात हजार अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत. तसेच बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची संख्या सुमारे दीड हजार आहे. महापालिकेतील सर्व वर्ग १ ते ४ मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध लाभ दिले जातात. बोनस संदर्भात महापालिका आणि कर्मचारी महासंघात या संदभार्तील तीन वर्षांपूर्वी करार झालेला आहे. त्यानुसार ८.३३ टक्के बोनस आणि १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे ठरले आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळीपुर्वी बोनस व सानुग्रह अनुदान देण्याची रक्कम देण्याची विनंती कर्मचारी महासंघाने महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार चर्चा करण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, मुख्य लेखापाल जितेंद्र कोळंबे, कामगार कल्याण विभागाचे सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, महासंघाचे महासचिव चारुशिला जोशी, कार्याध्यक्ष मनोज माछरे, महाद्रंग वाघेरे, नितीन समगीर, दिगंबर चिंचवडे, विशाल भुजबळ, सुनिल विटकर उपस्थित होते.
पाच हजारांनी बोनसमध्ये वाढ
महापालिका कर्मचाऱ्यांबरोबरच घंटागाडी कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी दिवाळीसाठी पंधरा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे ठरले होते. यावर्षी घंटागाडी कर्मचाऱ्यांनी सानुग्रह अनुदानात वाढ करावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि प्रशासनाने ही मागणी मान्य करीत यावर्षी वाढ केली आहे. घंटागाडी कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये बक्षीस रक्कम दिली जाणार आहे.