‘उत्पादनशुल्क’कडून मद्याचा साठा जप्त
By admin | Published: April 29, 2017 04:10 AM2017-04-29T04:10:42+5:302017-04-29T04:10:42+5:30
परराज्यांत तयार केलेल्या मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तस्करांवर राज्य उत्पादनशुल्कच्या तळेगाव दाभाडे विभागाच्या पथकाने
वडगाव मावळ : परराज्यांत तयार केलेल्या मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तस्करांवर राज्य उत्पादनशुल्कच्या तळेगाव दाभाडे विभागाच्या पथकाने मरकळ गावाच्या हद्दीत आळंदी-लोणीकंद रस्त्यावर कारवाई केली. सुमारे पावणेचार लाखांचा मुद्देमाल कारवाईत जप्त करण्यात आला.
तळेगाव दाभाडे येथील राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या पथकाने गस्त घालत असताना संशयास्पद चारचाकी वाहन (एमएच १२ केएन १५२२) थांबवून तपासणी केली. त्यात विदेशी मद्याचे १८० मि.लि. क्षमतेच्या बाटल्यांचे तीन बॉक्स (१४४ बाटल्या) मिळून आल्या. या वाहनातून अवैधरीत्या मद्य वाहतूक करीत असताना मिळून आल्याने आरोपी राजू नामदेव धोत्रे यास अटक करून वाहनासह मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला. जप्त केलेल्या वाहनाची अंदाजे किंमत तीन लाख, मद्य, बूच यांची अंदाजे किंमत ७६ हजार ५०० रुपये असा एकूण ३ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (वार्ताहर)