ग्राहकांकडून स्वत:च्या फोन पेवर घेतले पैसे; पेट्रोलपंपचालकाची तब्बल २१ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 06:23 PM2022-12-15T18:23:48+5:302022-12-15T18:24:20+5:30
पेट्रोलपंपावर कामावर असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांकडून स्वत:च्या फोन पेद्वारे पैसे स्वीकारले
पिंपरी : पेट्रोलपंपावर कामावर असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांकडून स्वत:च्या फोन पेद्वारे पैसे स्वीकारून पेट्रोलपंपचालकाची तब्बल २१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना १ ऑगस्ट २०२२ ते ८ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत भोसरीतील पेट्रोलपंपावर घडली. या प्रकरणी बुधवारी (दि. १४) भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी वैभव बाळासो जाधव (रा. दिघी), रोहीत विजय माने (रा. सद्गुरुनगर, भोसरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे लक्ष्मी एनर्जी अण्ड फ्यूल पंपावर काम करीत होते. त्यांनी संगनमत करून पेट्रोलपंपचालकांची कोणतीही परवानगी न घेता स्वत:च्या फायद्याकरिता ग्राहकांकडून येणारे पैसे स्वत:च्या फोन पेवर क्युआर कोडद्वारे स्वीकारले. तब्बल २१ लाख ५० हजार रुपये स्वीकारून फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक करून पैशाचा अपहार केला.