पिंपरी चिंचवडमध्ये सराईत गुन्हेगारांना अद्दल घडविण्यासाठी गुन्हेगार मोन्या लुडेकरला केला तडीपार
By नारायण बडगुजर | Published: May 2, 2024 03:17 PM2024-05-02T15:17:47+5:302024-05-02T15:19:34+5:30
लुडेकर याने स्वतःची टोळी बनवून तो त्या माध्यमातून वेगवेगळे गुन्हे करीत असल्याने त्याच्यावर कारवाई केली...
पिंपरी : सराईत गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्यासाठी पिंपरी-चिंचवडपोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. यात चिखली परिसरातील सराईत गुन्हेगार मोन्या लुडेकर याला दोन वर्षांसाठी तडीपार केले. लुडेकर याने स्वतःची टोळी बनवून तो त्या माध्यमातून वेगवेगळे गुन्हे करीत असल्याने त्याच्यावर कारवाई केली. पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी याबाबतचे आदेश दिले.
आदर्श उर्फ मोन्या विठ्ठल लुडेकर (२२, रा. शरदनगर, चिखली) असे तडीपार केलेल्याचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोन्या लुडेकर हा काहीही कामधंदा करत नाही. त्याने स्वतःची गुन्हेगारी टोळी बनवून त्या माध्यमातून चिखली परिसरात वेगवेगळे गुन्हे केले. त्याच्या विरोधात चिखली पोलिस ठाण्यात जबरी चोरी, अवैधरित्या शस्त्र जवळ बाळगणे, बेकायदेशीरपणे जमाव जमवणे, गंभीर दुखापत करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दादागिरीमुळे चिखली परिसरात दहशत निर्माण झाली.
मोन्या लुडेकर याच्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिक त्याला विरोध करत नसत. तसेच त्याच्याबाबत पोलिसांकडे तक्रार देखील देत नव्हते. ही दहशत मोडून काढण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी मोन्या याच्या विरोधात तडीपारीची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त डाॅ. शिवाजी पवार यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत उपायुक्त डाॅ. पवार यांनी मोन्या याला १ मे २०२४ रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले.
पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, सहाय्यक निरीक्षक उद्धव खाडे, उपनिरीक्षक राजेश मासाळ, पोलिस अंमलदार सचिन गायकवाड, दुर्गा केदार यांनी ही कामगिरी केली.
पोलिसांच्या या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली. चिखली परिसरात गुंडगिरी व दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर यापुढे देखील अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येईल.
- ज्ञानेश्वर काटकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चिखली