तब्बल ५० कोटींची फसवणूक करणारे पती-पत्नी अद्याप पसारच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 12:25 AM2019-01-09T00:25:54+5:302019-01-09T00:26:21+5:30
सदर गुन्हा आर्थिक गुन्हेअन्वेषण शाखेकडे गेला. मात्र दोन वर्ष होऊनही आरोपींना शोध लागला नाही.
वडगाव मावळ : मावळ, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसह महिलांना चिटफंडात ठेवीच्या रकमेवर दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखून सुमारे ५० कोटी रुपयांची फसवणूक करून पती-पत्नी पसार झाले. स्थानिक पोलिसांना त्यांना पकडण्यात यश आले नाही. याप्रकरणी छडा लागेना म्हणून महिलांनी उपोषण केले. सदर गुन्हा आर्थिक गुन्हेअन्वेषण शाखेकडे गेला. मात्र दोन वर्ष होऊनही आरोपींना शोध लागला नाही. व्याजाला भुलले आणि मुद्दलही गमावले, अशी म्हणायची वेळ ठेवीदारांवर आली आहे.
दतात्रेय गायकवाड व त्यांची पत्नी सुनीता यांनी चिटफंडात ठेवीच्या रकमेवर दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून पिंपरी-चिंचवड, मावळातील कामशेत, लोणावळा, कार्ला, मळवली व अन्य गावांतील महिलांकडून पैसे गोळा केले. चिटफंडाच्या नावाखाली सन २०१२ पासून दुप्पट परतावा देण्याचे काम सुरू केले. दुप्पट परतावा मिळत गेल्याने त्या लोभापायी अनेक महिलांसह काही राजकीय पक्षातील आजी माजी पदाधिकारी यांनी मोठ्या रकमेची गुंतवणूक केली. सुरुवातीला या दाम्पत्याने ठेवीदारांच्या घरी जाऊन परतावा देऊ लागले. त्यामुळे महिलांचा विश्वास वाढत गेला. ठेवी ठेवण्यासाठी ठेवीदारांची रीघ लागली. ८ आॅगस्ट २०१७ रोजी दाम्पत्याने लोणावळा येथील भांगरवाडीतील सदनिकेला कुलूप लावून निघून गेले, ते आलेच नाही. कामशेत येथील काही महिलांनी धाव घेतली त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला. आठ महिन्यांत आरोपींचा शोध लागला नाही. त्यामुळे महिलांनी वडगाव येथे उपोषण केले. त्यानंतर सदरचा गुन्हा गुन्हेअन्वेषण शाखेकडे वर्ग झाला. दोनवर्ष होऊनही अद्याप ठेवीदारांच्या हाती काहीच आले नाही.
आरोपींचा शोध अद्याप सुरूच
आर्थिक गुन्हेअन्वेषण शाखेचे- तपास पोलीस अधिकारी स्वराज्य पाटील माहिती देताना सांगितले की, आरोपींचे बँकेतील खाते गोठवले आहे. त्यामध्ये २० लाख रुपये किमतीचे दागीने व एक बुलेट मोटार सायकल जप्त केली आहे. स्थावर मालमत्तेची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी मावळचे प्रांत यांची नियुक्ती केली आहे. न्यायालयातून वॉरंटदेखील निघाले आाहे. दोन गुन्हे दाखल केले आहेत त्यांचा अध्याप शोध लागला नाही. शोध घ्यायचे काम चालू आहे.