नोंदणी पद्धतीच्या विवाहाकडे अधिक कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:59 AM2019-04-01T00:59:09+5:302019-04-01T00:59:24+5:30
उपनिबंधक कार्यालय : अवाढव्य खर्चाला फाटा देण्यासाठी पर्याय
रहाटणी : ‘लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून’ असे म्हटले जाते. आयुष्यात एकदाच येणारा हा सुंदर क्षण धुमधडाक्यात साजरा करावा, असे प्रत्येकाला वाटते. पण लग्नकार्यात होणारा खर्च, हॉलचे भाडे, भोजन हा सर्व खर्च आवाक्याबाहेर जात असल्याने आता नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा ट्रेंड रूजू लागला आहे.
नोंदणी विवाहासाठी महिनाभर आगादेर विवाह नोंदणी निबंधक कार्यालयाकडे अर्ज द्यावा लागतो. नंतर विवाह सोहळ्यापूर्वी दोन साक्षीदारांची उपस्थिती, वयाचा दाखला, रहिवासी पुरावा, छायाचित्र अर्जासोबत द्यावे लागते. नोंदणी झाल्यानंतर साक्षीदारांच्या उपस्थितीत हा विवाह लावला जातो. विवाहनोंदणीनंतर आठ ते पंधरा दिवसांनी दाखला दिला जातो. प्रत्येकाच्या लग्न करण्याच्या धार्मिक पद्धती वेगळ्या असल्या तरी लग्नाची प्रत्यक्ष नोंदणी होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
राज्यात विवाह नोंदणी अधिनियम १९९८ नुसार नोंदणी केली जाते. नोंदणी करण्याबाबत अपुरी माहिती, काही गैरसमज अशी अनेक कारणे दिसून येतात. नोंदणी पद्धतीचा विवाह हा कायदेशीर विवाह असतो.