मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना शंभरी भरण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 01:45 AM2018-08-29T01:45:17+5:302018-08-29T01:46:10+5:30
रस्त्याच्या कडेला वाढले गवत : नागरिकांना चालावे लागते जीव मुठीत धरून
रहाटणी : पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून महापालिकेच्या वतीने वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; मात्र आपले शहर खरेच स्वच्छ आहे का, हा प्रश्न अनेक वेळा शहरातील सर्वसामान्य नागरिकांना सतावत आहे. कारण रस्त्यावर अस्वच्छता, रस्त्याकडेला गवताचे साम्राज्य, ठिकठिकाणी पाण्याची डबकी दिसून येत आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या गवतामुळे सकाळ-संध्याकाळ शतपावली करायला जाणाºया नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित विभागाने रस्त्याकडेला वाढलेले गवत लवकरात लवकर काढण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
रस्ता स्वच्छता करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कायमस्वरूपी कामगार व ठेकेदारामार्फत ठेवलेले कामगार स्वच्छतेचे काम करतात. मात्र ही स्वच्छता होते का हे पाहण्याची जबाबदारी महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांची आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने रस्त्यावरील स्वच्छता म्हणावी तशी होत नाही कारण सध्या पाऊस सुरू असून स्वच्छता करणाºया कामगारांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे जरी असले तरी निदान रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात वाढलेले गवताचे साम्राज्य काढून टाकण्याची तसदी महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली पाहिजे. मात्र तसे होताना दिसून येत नाही. सुमारे १२ कोटी रुपये खर्च करून पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक ते स्वराज गार्डन चौक यादरम्यान अत्याधुनिक पद्धतीने लिनिअर गार्डन साकारण्यात आले आहे. सध्या या गार्डनचे काम ७० ते ८० टक्के पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक नागरिक या गार्डनमध्ये फेरफटका मारण्यासाठी येतात. मात्र ४५ मीटर बीआरटीएस रस्ता व लीनिअर गार्डन या दोन्हींच्या मध्ये जो फूटपाथ आहे, त्या फुटपाथच्या कडेला मोठ्या प्रमाणात गवताची वाढ झालेली आहे. त्यामुळे फेरफटका मारायला येणाºया नागरिकांना, वृद्धांना, महिलांना, तरुण-तरुणींना जीव मुठीत घेऊन सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारावा लागत आहे. हीच परिस्थिती गोविंद-यशदा चौकाचीदेखील आहे.
अशी परिस्थिती या दोन ठिकाणाची नसून रहाटणी, काळेवाडी पिंपळे सौदागर परिसरातील अनेक रस्त्यांवर अनेक सोसायट्यांमधील रस्त्यांवर गवताचे साम्राज्य पसरलेली परिस्थिती नजरेस पडत आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागातील स्वच्छता करणाºया कर्मचाºयांचे नेमके काय काम असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. पावसाचे दिवस असल्यामुळे रस्ते व कॉलनी परिसरातील स्वच्छतेकडे काही प्रमाणात स्वच्छता कर्मचाºयांचे दुर्लक्ष होत असले, तरी निदान कॉलनीतील मुख्य रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात उगवलेले गवत काढण्याची तसदी घ्यावी व महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाºयांनी याकडे वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
सध्या अनेक साथीच्या आजारांनी नागरिक हैराण आहेत. ताप, तीव्र ताप, सर्दी, खोकला, डेंगी, मलेरिया, डायरिया अशा आजाराने नागरिक हैराण आहेत. यातच स्वाइन फ्लूसारख्या अतिघातक आजाराने सुद्धा हळूहळू आपले डोके वर काढले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, एवढीच माफक अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.