मोरवाडी आग प्रकरण: पर्यावरणास हानी पोहोचविल्याप्रकरणी अमृतेश्वरला दहा लाख दंड, पालिकेची कारवाई
By विश्वास मोरे | Published: March 1, 2024 09:00 AM2024-03-01T09:00:33+5:302024-03-01T09:01:04+5:30
ही कारवाई महापालिकेचे सह शहर अभियंता सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी केली आहे....
पिंपरी : मोरवाडी, पिंपरी येथील मोकळ्या जागेतील भंगार मालाला लागलेल्या आगीमुळे पर्यावरणास हानी पोहोचविल्याबद्दल पुण्यातील अमृतेश्वर ट्रस्टला महापालिकेचे वतीने दहा लाख दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. ही कारवाई महापालिकेचे सह शहर अभियंता सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी केली आहे.
मोरवाडीतील पिंपरी न्यायालयाजवळ सर्व्हे क्रमांक ३०/१०/५७ येथ अमृतेश्वर कॉलनी आहे. तर पुण्यात अमृतेश्वर ट्रस्टचे कार्यालय आहे. कॉलनी शेजारी ट्रस्टची मोकळी जागा आहे. या जागेत मोठ्या प्रमाणावर भंगाराचे साहित्य होते. त्या ठिकाणी दिनांक २१ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजून ४१ मिनिटांनी आग लागली. त्यानंतर पिंपरी, चिंचवड, प्राधिकरण, भोसरी, रहाटणी, मोशी, थेरगाव, ताथवडे, पुनावळे येथील अग्निशामक दलाचे १० बंब तसेच खडकी आणि देहूरोड कॅन्टोन्मेंटचे ६ असे एकूण १६ बंब दाखल झाले होते. सलग दोन ते तीन दिवस ही आग धुमसत होती. तसेच ६० कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते.
या घटनेमुळे पर्यावरणास मोठी हानी पोहोचली. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना दुर्गंधी आणि प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रबर, प्लास्टिकचे ड्रम, टायर ठेवण्यात आले होते. त्यामुळे आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.
या कलमांतर्गत झाली कारवाई
पर्यावरणास हानी पोहोचविणे आणि प्रदूषणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ नुसार आणि महाराष्ट्र सरकारच्या प्रदूषण नियंत्रण १९८६ च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या पथकाने पुण्यातील जंगलीमहाराज रस्ता येथील अमृतेश्वर ट्रस्टच्या कार्यालयात जाऊन नोटीस देण्यात आली. दहा लाख दंड केला आहे. हा दंड तातडीने भरण्यात यावा, अन्यथा पुढील कारवाई केली जाईल, असे कुलकर्णी यांनी दिलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे.