मोरया गोसावी देवस्थानला मिळणार तीर्थक्षेत्राचा दर्जा : खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 11:48 AM2020-10-08T11:48:12+5:302020-10-08T11:48:45+5:30
पर्यटन मंत्री व ग्रामविकास मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
पिंपरी : साडेचारशे वर्षांपूर्वीचा इतिहास असलेल्या चिंचवडगांवातील श्री मोरया गोसावी देवस्थानला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, याबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे लवकरच चिंचवड देवस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळेल, असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला आहे.
खासदार बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे आणि चिंचवडगावातील स्थानिक नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची बुधवारी भेट घेतली. चिंचवड येथील श्री मोरया गोसावी देवस्थानचे महत्व दोनही मंत्र्यांना सांगत तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची विनंती केली. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, चिंचवड येथील श्री मोरया गोसावी देवस्थानचा साडेचारशे वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. देवस्थानाअंतर्गत अष्टविनायकांपैकी तीन अष्टविनायक क्षेत्र येतात. यात थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेक या अष्टविनायक क्षेत्रांचा समावेश आहे. अष्टविनायकाची यात्रा सुरु करताना किंवा शेवट करताना चिंचवड देवस्थानातील गणपतीच्या दर्शनाने केला जातो अशी आख्यायिका आहे. याला खूप मोठे महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीपासून छत्रपती संभाजी महाराजांनी संस्थानाला जमिनी दिल्या होत्या. या देवस्थानाला ऐतिहासिक महत्व आहे. लाखोंच्या संख्येने भाविक मंदिरात येतात.
दरवर्षी श्री मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी महोत्सवाचे आयोजन केले जाते. गणेशचतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे तीर्थक्षेत्राला 'ब' दर्जा देण्यात यावा. हा दर्जा प्राप्त झाल्यानंतर सरकारच्या पर्यटनाच्या आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्रात चिंचवड देवस्थानचा समावेश केला जाईल. त्यामुळे विकासकामांना चालना मिळेल. राज्य सरकारच्या पातळवीर महत्व प्राप्त होईल.