इंद्रायणी नदी परिसरात डासांचा उपद्रव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 01:45 AM2018-09-30T01:45:14+5:302018-09-30T01:45:36+5:30
कुजलेली जलपर्णी : नागरिकांचे आरोग्य धोक्यात, साफसफाईची मागणी
दिघी : इंद्रायणी नदीतील दूषित पाण्यावर आळंदीतील नवीन पुलाजवळ कुजलेल्या जलपर्णीमुळे परिसरात डासांची पैदास वाढल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डासांचा उपद्रव होत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे इंद्रायणी नदीत कुजलेली जलपर्णी तत्काळ काढण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. इंद्रायणी नदीचे चौंडी घाटालगत परिसरातील गवतांसह झाडे झुडपांच्या साम्राज्याने नागरिकांतून नाराजी वाढली आहे.
चिखली, कुदळवाडी, कुरुळी, चिंबळी परिसरातील रसायन व मैलामिश्रित सांडपाणी अनेक ठिकाणी थेट इंद्रायणी नदीपात्रात येत असल्याने आळंदी परिसरात नदीचे प्रदूषण वाढले आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने तसेच उन्हाने वाळलेली जलपर्णी कुजून चालली आहे. या जलपर्णीवर वाहून आलेला कचरा या ठिकाणी साचतो, त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. ही कुजलेली जलपर्णी इंद्रायणी नदीबाहेर काढण्याची मागणी नागरिक
करीत आहेत. जलपर्णी काढून नदीपात्र प्रदूषणविरहीत करण्याची मागणी केली.
इंद्रायणी नदी परिसरात डासांचा उपद्रव वाढला आहे. यात आळंदीतील इंद्रायणीनगर, गोपाळपूर, इंद्रायणी नदीलगतच्या दुतर्फा नागरिकांसह भाविकांना या डासांच्या त्रासास सामोरे जावे लागत आहे. अनेक नागरिकांना डास चावल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. आळंदी नगर परिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने कुजलेली जलपर्णी तसेच नदीकिनाऱ्यालगत दुतर्फा वाढलेले गवत व झाडाझुडपांचे साम्राज्य हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. इंद्रायणी नदीत कुजलेली व साचलेली जलपर्णी हटाव मोहीम राबविण्यासह जंतुनाशक फवारणी, नदीचे परिसरात धुरीकरण करण्याची मागणी ही नागरिकांनी केली आहे.