तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री
By admin | Published: December 26, 2016 03:08 AM2016-12-26T03:08:23+5:302016-12-26T03:08:23+5:30
शहरातील बहुतेक शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची राजरोसपणे विक्री सुरू असून, अनेक अल्पवयीन विद्यार्थी व्यसनांच्या आहारी जात असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
कामशेत : शहरातील बहुतेक शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची राजरोसपणे विक्री सुरू असून, अनेक अल्पवयीन विद्यार्थी व्यसनांच्या आहारी जात असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
कामशेत शहरातील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारी दुकाने तसेच टपऱ्या आहेत. कामशेत ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांमध्ये शाळा परिसरात ठरावीक अंतरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदीचे ठराव अनेकदा झाले. मात्र, या दुकान व टपरी चालकांवर आतापर्यंत कोणतीच कारवाई न झाल्याने ते राजरोसपणे या पदार्थांची विक्री करीत आहेत. त्यांना कोणाचीच भीती राहिली नसल्याचे बोलले जात आहे. शहरातील शाळा परिसरात सर्रास या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असल्याने अनेक अल्पवयीन विद्यार्थी मुले व्यसनाच्या आहारी जात असल्याच्या तक्रारींत वाढ झाली आहे.
राज्यात गुटखाबंदी असूनही शहरात खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. मावळातील अनेक दुकानदार शहरातून होलसेल भावात गुटखा विकत घेऊन दुप्पट किमतीला विकत आहेत. या सर्व प्रकाराकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनाला वेळ नसल्याने या विक्रेत्यांचे फावले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जमान्यात सर्वकाही सोपे व जवळ आल्याने त्याचा सर्वांना फायदा होत असला, तरी तोटेही अनेक असल्याचे दिसत आहेत. फोर जी व थ्री जी फोनच्या जमान्यात, तसेच सिनेमातून दाखवण्यात येणाऱ्या दृष्यांमुळे अनेक अल्पवयीन मुले भारावून जात असून सिनेमातल्या नायकाप्रमाणे वागण्याकडे त्यांचा कल वाढतो. अनेक मुले तसे वागतानाही दिसत आहेत. गुटखा खाणे, सिगारेट पिणे म्हणजे वयाने मोठे झाल्याचे लक्षण समजून अनेक अल्पवयीन मुले या व्यसनांच्या आहारी जात आहेत. शहरातील अनेक तंबाखूजन्य पदार्थ गुटखा विक्री दुकानात व टपऱ्यांवर अल्पवयीन मुलांचा वावर वाढला असून, सिगारेट पिणे म्हणजे त्यांना मोठेपणाचे वाटते आहे. संबंधित प्रशासनाने शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांवर पूर्ण बंदी घालून या दुकानदार व टपऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पालक करीत आहेत. (वार्ताहर)