शहरातील ‘नो हॉकर्स’ रस्त्यांवरच सर्वाधिक ‘हॉकर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 11:39 PM2018-11-12T23:39:12+5:302018-11-12T23:39:30+5:30
वाहतूककोंडीचा सामना : अंमलबजावणी झाल्यास पिंपरी-चिंचवडकरांना किमान फुटपाथवर चालता येईल
पिंपरी : शहरातील प्रामुख्याने बाजारपेठा, गर्दी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी व्हावी, नागरिकांना फुटपाथवरून किमान चालता यावे यासाठी ‘नो हॉकर्स’ झोन जाहीर केले; परंतु सध्या शहरात ‘नो हॉकर्स’ रस्त्यांवरच सर्वाधिक हॉकर्स असल्याचे चित्र असून, सणासुदीच्या काळात फुटपाथ, रस्त्यांवरील हॉकर्सची संख्या प्रचंड वाढते. यामुळे सध्या प्रमुख बाजारपेठा असलेल्या भागात खरेदीसाठी नागरिकांना वाहतूककोंडीचा व फुटपाथवर चालण्यासाठी देखील जाग नसल्याने प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.
केंद्र शासन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुणे शहरात फेरीवाला धोरण तयार करण्यात आले. वाढत असलेली वाहनसंख्या व गर्दी लक्षात घेऊन रस्त्यांवरील विक्रेत्यांसाठी अत्यंत कडक नियमावली तयार करण्यात आली. शहरातील या नो हॉकर्स रस्त्यांवर व चौकांमध्ये पथारीवाले, फेरीवाले आदींना व्यवसाय करता येणार नाही, असेदेखील निश्चित करण्यात आले. यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने या नो हॉकर्स झोनमध्ये फुटपाथ, रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांच्या विरोधात वारंवार कारवाई करण्यात येते. परंतु सध्या तरी शहरातील नो हॉकर्स झोन कागदावर राहिले असल्याचे स्पष्ट ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीमध्ये निदर्शनास आले.
शहराच्या मध्यवस्ती भागातील बाजारपेठाच्या रस्त्यांवर प्रचंड गर्दी झाली आहे. विविध प्रकारच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली असली, तरी नो हॉकर्स रस्त्यांवर, फुटपाथवर मोठ्या प्रमाणात
हॉकर्सने अनधिकृतपणे अतिक्रमण केले आहे. यामुळे नागरिकांच्या गर्दीबरोबरच हॉकर्सच्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली आहे.