शहरात चिनी मांजाची सर्रास विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 01:08 AM2019-01-13T01:08:33+5:302019-01-13T01:08:52+5:30
प्रशासनाचे कारवाईकडे दुर्लक्ष : मांजामुळे अनेक निष्पापांचा नाहक बळी; पक्ष्यांच्याही जीविताला धोका
पिंपरी : वेळ दुपारी साडेतीनची... ठिकाण पिंपरी-चिंचवडमधील अजमेरा येथील एक दुकान... पतंग व मांजा मिळेल का, या प्रश्नावर दुकानदार म्हणाला, ‘हो कसा पाहिजे?’ ‘मांजा चांगल्या दर्जाचा पाहिजे.’ सुरुवातीला मांजाचे दोन-तीन प्रकार दाखवण्यात आले. ‘न तुटणारा मांजा पाहिजे आहे. चिनी मांजा आहे का?’ ‘हो. हा चिनी व नॉयलान मिक्स असा मांजा आहे,’ असे दुकानदाराने सांगितले. पिंपरी-चिंचवड शहरात चिनी मांजा विक्री होत आहे का, याबाबत ‘लोकमत’ने ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. या वेळी चिनी मांजाची शहरात सर्रास विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडविण्याची प्रथा आहे. पतंग उडविण्यासाठी चिनी, नायलॉन आणि सिंथेटिक मांजा वापरण्याकडे कल वाढला आहे. मात्र या मांजामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, पक्ष्यांनाही जीव गमवावा लागत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. त्यामुळे अशा घातक मांजावर बंदी आहे. असे असतानाही काही विक्रेते या घातक मांजाची सर्रास विक्री करीत आहेत. महापालिका आणि संबंधित प्रशासनाने बंदीची अंमलबजावणी केली नसल्याने अशा विक्रेत्यांचे फावले आहे. कारवाई होत नसल्याने अशा मांजाची खुलेआम विक्री होत आहे. पिंपरी येथील काही विक्रेत्यांनी नायलॉन मांजा विक्रीसाठी दुकानाच्या बाहेर दर्शनी भागात ठेवला आहे. मात्र, त्याला चिनी मांजा न म्हणता टिकाऊ असल्याचे सांगितले जात आहे.
मुलांची चिनी मांजालाच पसंती
दुकानाच्या बाहेर साधा मांजा लावतात. ग्राहकांनी मागणी केली की, चिनी व नायलॉन मांजा देतात व कोठेही याबद्दल माहिती सांगू नका, असे दुकानदारांकडून सांगण्यात येते. बंदी असतानाही शहरात चिनी व नायलॉन मांजा कुठून येतो, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. चिनी मांजाच्या एका रिळाची किंमत १६० रुपये आहे. लहान मुलेदेखील अशा घातक मांजाची खरेदी करतात. पतंग उडविताना पुरेशी खबरदारी न घेतल्याने अशा मांजामुळे लहान मुलांचे हात कापण्याचे व अपघाताचे प्रकार सातत्याने घडत आहे, असे असतानाही ग्राहकांकडून अशा मांजाला मोठी मागणी आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे.