‘खाकी’तील मातृत्वाला पाझर अन् महिलेची रस्‍त्‍यातच प्रसुती; आयुक्‍तांच्‍या हस्‍ते महिला पोलिसांचा सत्‍कार

By नारायण बडगुजर | Published: December 2, 2024 08:36 PM2024-12-02T20:36:24+5:302024-12-02T20:36:41+5:30

रुग्णवाहिका व डाॅक्टर येण्यास विलंब झाल्याने महिला पोलिसांनी तिला आडोशाला नेऊन महिलेची प्रसूती केली

Motherhood in police and women giving birth on the street Female police officers felicitated by the commissioner in pimpri chinchwad | ‘खाकी’तील मातृत्वाला पाझर अन् महिलेची रस्‍त्‍यातच प्रसुती; आयुक्‍तांच्‍या हस्‍ते महिला पोलिसांचा सत्‍कार

‘खाकी’तील मातृत्वाला पाझर अन् महिलेची रस्‍त्‍यातच प्रसुती; आयुक्‍तांच्‍या हस्‍ते महिला पोलिसांचा सत्‍कार

पिंपरी : दोन महिला पोलिस कर्तव्यावर असताना प्रसव वेदना होत असलेल्या एका गरोदर महिलेने त्यांना मदत मागितली. रुग्णवाहिका व डाॅक्टर येण्यास विलंब झाल्याने महिला पोलिसांनी तिला आडोशाला नेऊन तिची प्रसूती केली. महिलेने एका गोंडस बाळाला जन्‍म दिला. ही घटना रविवारी (दि. १) दुपारी चार वाजताच्‍या सुमारास वाकड नाका येथे घडली. या महिला पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पोलिस अंमलदार नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख या हिंजवडी वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. शनिवारी (दि. १) दुपारी त्या वाकड नाका येथे कर्तव्यावर हजर होत्या. दुपारी चार वाजताच्या सुमारास राजश्री माधव वाघमारे (वय २५) प्रसूतीसाठी औंध रुग्णालय येथे जात होत्या. हिंजवडी वाहतूक विभागाच्या कार्यालयाजवळ आल्यानंतर राजश्री यांच्या पोटात दुखू लागले आणि त्यांना प्रसव वेदना सुरू झाल्या.

भर रस्त्यावर त्रास सुरू झाल्याने त्यांनी चौकात वाहतूक नियमन करत असलेल्या नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख यांना मदतीसाठी बोलावले. चव्हाण आणि शेख यांनी महिलेकडे धाव घेतली आणि रुग्णवाहिकेला पाचारण केले. रुग्णवाहिका आणि डॉक्टर येण्यासाठी काही वेळ लागणार होता. राजश्री यांचा त्रास वाढत होता. त्यामुळे चव्हाण आणि शेख यांनी राजश्री यांना वाहतूक विभागाच्या बाहेरील बाजूस रोडच्या कडेला असलेल्या खोलीमध्ये आडोशाला नेले. दरम्यान, रुग्णवाहिका आणि डॉक्टर येण्यापूर्वीच राजश्री यांनी गोंडस मुलाला जन्म दिला. डॉक्टर आल्यानंतर त्यांनी बाळाची व राजश्री यांची तपासणी केली. त्यानंतर दोघांनाही पुढील उपचारासाठी औंध रुग्णालय येथे नेण्यात आले. 

नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख यांनी प्रसंगावधान राखत महिलेला मदत केली. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलिस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांनी नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख यांचा सत्कार करत शाबासकी दिली. यावेळी वरिष्‍ठ पोलिस निरीक्षक प्रसाद गोकुळे हे देखील उपस्थित होते.

Web Title: Motherhood in police and women giving birth on the street Female police officers felicitated by the commissioner in pimpri chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.