आई रागावल्याने मुलीने सोडले घर आणि पुढे घडले असे काही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 08:14 PM2020-02-20T20:14:42+5:302020-02-20T20:24:37+5:30
बुधवारी सकाळी काही कारणांवरून तिला तिच्या आईने रागवले. हा राग मनात धरून ती पाणी घेऊन येते, असे सांगून घराबाहेर पडली व थेट पुणे-लोणावळा लोकलमध्ये बसली.
कामशेत : आई रागावली म्हणून कुणालाही काही न सांगता रागात घराबाहेर पडलेली, एक १२ वर्षीय मुलगी पुणे ते मुंबई असा लोकलने प्रवास करताना एका वयोवृद्ध आजीस आढळली. त्या आजीने तिच्याशी संवाद साधत तिची समजूत काढून तिला आपल्याबरोबर कामशेतरेल्वे स्थानकातील रेल्वे अधिकाऱ्यांकडे सोपवले. त्यामुळे मुलीची तिच्या आई-वडिलांशी पुन्हा भेट झाली. अनुराधा गाडे असे या मुलीचे नाव असून ही घटना बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमार घडली.
तळेगाव रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार ( दि. १९ ) रोजी अनुराधा ही मागील काही वर्षांपासून मुंबईमध्ये तिच्या आजीकडे राहत होती.दरम्यान, काही दिवसांपूर्वी ती पुण्यातील हडपसर भागात राहत असलेल्या तिच्या आईकडे आली होती. मात्र, बुधवारी सकाळी काही कारणांवरून तिला तिच्या आईने रागवले. हा राग मनात धरून ती पाणी घेऊन येते, असे सांगून घराबाहेर पडली व थेट पुणे-लोणावळा लोकलमध्ये बसली.
यावेळी ती खूप भांबवलेली होती, तिच्याकडे मोबाइल देखील नव्हता. हे पाहून याच रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका वृद्ध महिलेने तिची चौकशी केली. तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्याने त्या महिलने तिला मी तुला बसमध्ये बसवून देते. तू रेल्वेने एकटी जाऊ नको असा सल्ला दिला. या महिलेवर विश्वास बसल्याने महिलेने तिला आपल्याबरोबर घेतले. कामशेत रेल्वेस्थानक आल्या नंतर येथे उतरून रेल्वे प्रशासन व रेल्वे अधिकाऱ्यांकडे मुलीला सोपवून आजी निघून गेली. तळेगाव लोहमार्ग महिला रेल्वे पोलीस कर्मचारी एस. मोहिते यांनी मुलीची सविस्तर माहिती घेत व तिच्या आई-वडिलांशी संपर्क साधुन तिला त्यांच्या स्वाधीन केलं. यावेळी पालकांनी पोलिसांचे व न भेटलेल्या आजीचे मनःपूर्वक आभार मानले.