जमिनीच्या वादातून आई-वडिलांना बेदम मारहाण
By admin | Published: April 19, 2017 04:12 AM2017-04-19T04:12:38+5:302017-04-19T04:12:38+5:30
भगतवाडी (ता. इंदापूर) येथे जमीनवाटपाच्या वादातून थोरल्या मुलाकडूनच स्वत:च्या आई-वडील व लहान भावांना मारहाण झाली.
बावडा : भगतवाडी (ता. इंदापूर) येथे जमीनवाटपाच्या वादातून थोरल्या मुलाकडूनच स्वत:च्या आई-वडील व लहान भावांना मारहाण झाली. यात वडीलव एक भाऊ गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बावडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बावडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भगतवाडी (ता. इंदापूर) येथील श्रीपती गणपत काटकर हे पत्नी गोकुळा, मुले सतीश, महेश व सुना, नातवंडे असे एकत्रित राहतात, तर थोरला मुलगा समाधान त्याची पत्नी व मुलगी यांच्यासह शेजारीच राहतो. असे असताना गेल्या तीन वर्षांपूर्वी वडिलोपार्जित जमिनीचे वाटप आपापसांत बैठकीतून करण्यात आले होते. परंतु थोरला मुलगा समाधान यास हे वाटप मान्य नव्हते. या कारणामुळे तो सतत या ना त्या कारणाने घरात येऊन आई-वडील व भावांबरोबर वाद घालत असे.
याच कारणावरून गुरुवारी (दि. १३) रात्री नऊच्या सुमारास समाधान याने बेकायदा जमाव जमवत आई-वडील व भावांवर जिवे मारण्याच्या हेतूने लाकडी दांडके, लोखंडी सळई, मिरची पूड आदींच्या साहाय्याने तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत हल्ला केला. यामध्ये समाधानच्या सोबतीला त्याचा मेहुणा बापू दिलीप शिंदे (रा. शेटफळ हवेली), अक्षय सुरेश वाघ, भैया नाना वाघ (दोघेही रा. बागेचीवाडी, ता. माळशिरस) तसेच अन्य चार साथीदारांनी बेदम मारहाण केली. अन्य चार लोकांनी डोके व तोंड काळ्या टोप्यांनी झाकल्याने ते ओळखू आले नाहीत.
या सर्वांनी वडील श्रीपती, आई व दोन भाऊ यांना डोक्यात, पाठीवर, छातीवर मारल्याने यातील श्रीपती व महेश हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अकलूज (ता. माळशिरस) येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आई गोकुळा व भाऊ सतीश यांना किरकोळ दुखापत झाली असल्याने प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले. या गुन्ह्यात बापू शिंदे याच्या (एमएच ४२/ २८४१) या क्रूझर जीपचा हल्लेखोरांनी पळून जाण्यासाठी वापर केला.
बावडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्रसिंह निंबाळकर हे अधिक तपास करीत आहेत.