मोडीच्या प्रसारासाठी युवतीचा अनोखा प्रयत्न
By Admin | Published: March 21, 2017 05:15 AM2017-03-21T05:15:36+5:302017-03-21T05:15:36+5:30
मोडी लिपीच्या वळणदारपणामुळे टायपोग्राफी हा कलाशास्त्रातील विषय शिकणारी एक महाविद्यालयीन युवती मोडीच्या चांगलीच
पिंपरी : मोडी लिपीच्या वळणदारपणामुळे टायपोग्राफी हा कलाशास्त्रातील विषय शिकणारी एक महाविद्यालयीन युवती मोडीच्या चांगलीच प्रेमात आहे. तिने तिच्या दुचाकीवर शिवाजीमहाराजांचे मोडी लिपीमधील पत्रच प्रिंट करून घेतले आहे. हेल्मेटवरही मोडी संवर्धनासाठी प्रयत्न असा संदेश दिला असून नागरिक उत्सुकतेने तिची या उपक्रमाबाबत चौकशी करताना दिसत आहेत.
श्रुती गणेश गावडे (वय २१, चिंचवड) असे या युवतीचे नाव आहे. डी.वाय. पाटील महाविद्यालयात ती जाहिरात क्षेत्राच्या अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षात शिकत आहे. टायपोग्राफीचा अभ्यास करताना तिची मोडी लिपीशी ओळख झाली. भारत इतिहास संशोधक मंडळात चालणाऱ्या मोडी प्रशिक्षण वर्गात तिने मोडीच्या लेखन-वाचनाचा सराव केला. उडदाच्या डाळीपासून तिने मोडी अक्षरे असलेल्या चकल्याही मध्यंतरी तयार केल्या. त्या मुलांना खाऊ म्हणून दिल्या. खाऊचे पदार्थ मोडी लिपीमध्ये तयार केले, तर मोडीचा प्रसार लहान मुलांमध्येही होईल, असे तिला वाटते. मोडी लिपी सामान्यांनाही शिकता यावी यासाठी बाराखडीच्या धर्तीवर मोडीचा कित्ता तयार केला आहे. पुणे विद्यापीठाने नुकत्याच घेतलेल्या अक्षर लेखनस्पर्धेत मोडी लिपीच्या लेखनाबद्दल तिने पुणे जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकाविला.