‘युरो स्कूल’ची मान्यता रद्दच्या हालचाली
By admin | Published: April 6, 2016 01:19 AM2016-04-06T01:19:08+5:302016-04-06T01:19:08+5:30
येथील युरो किड्स शाळा व्यवस्थापनाकडून सातत्याने होणाऱ्या मनमानी कारभारामुळे शाळा व्यवस्थापन व त्रस्त पालक यांच्यात सुरू असलेला वाद चांगलाच पेटला आहे.
वाकड : येथील युरो किड्स शाळा व्यवस्थापनाकडून सातत्याने होणाऱ्या मनमानी कारभारामुळे शाळा व्यवस्थापन व त्रस्त पालक यांच्यात सुरू असलेला वाद चांगलाच पेटला आहे. नियमांची पर्वा न करता, पालकांना कुठलीही पूर्वकल्पना न देता अतिरिक्त फी न भरल्याच्या कारणावरून सुमारे १७ विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्यात आले. तर दोघांना डांबून ठेवण्यात आल्याने पालकांनी शाळेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. युवा सेनेने शाळेचा निषेध करीत घोषणाबाजी केली.
युरो स्कूलमध्ये विनाकल्पना वाढविलेली फी न भरल्याने विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढल्याने काही दिवसांपूर्वी पालकांचा वाद झाला होता. तेव्हा शाळेने उद्दामपणा करीत पालकांचे कुठलेही म्हणणे न ऐकता अनुभा सहाय यांच्यासह अनेक पालकांवर गुन्हे दाखल केले होते. तर आता थेट दाखले हातात देणे अन् विद्यार्थ्यांना डांबून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
संतप्त पालकांनी शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वाकड पोलिसांकडे करीत आहेत. फी वाढ रोखणे, शाळेची एनओसी, बोर्ड आदी मागण्यांबाबत पालक शाळेच्या प्रवेशद्वारासमोर सकाळपासूनच जमले होते. त्यातच युवा सेनेचे युवा अधिकारी राकेश वाकुर्डे, समन्वयक विशाल कलाटे, संजय संधू, अलन पंडित यांच्यासह कार्यकर्त्यांनी हा मुद्दा उचलत गोंधळ सुरू केल्याने शाळा परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते.
शालेय व बसची फी, शैक्षणिक शुल्क न भरल्याचा शेरा मारून व्यवस्थापनाने शाळा सोडल्याचा दाखलाच पालकांच्या हाती दिल्याने पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. शिक्षण हक्क कायद्यानुसार काही पालकांनी फी भरण्याची तयारी दर्शवत धनादेशासह ते शाळा आवारात दाखल झाले. मात्र, त्यांची पुन्हा फिरवाफिरवी केल्याने शाळा व्यवस्थापनाकडून मनमानी पद्धतीने तीन वर्षांच्या आत म्हणजे प्रत्येक वर्षी वाढीव फीची मागणी होत असल्याने कुठलीही बेकायदेशीर फी भरणार नसल्याचेही पालक अभिलाषा मुकीम,अनुराधा पांडे, पुनित गुप्ता, नीतेश बोरीकर, अनुभा सहाय यांच्यासह अन्य पालकांनी ठामपणे सांगितले.
या शाळेला शिक्षण विभागाची कुठलीही ना हरकत प्रमाणपत्र नसताना बेकायदेशीरपणे ही शाळा सुरू आहे. शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना प्रवेश देताना आयसीएसईची मान्यता असल्याची भुरळ पालकांना घातली. वास्तविक माहिती अधिकार कायद्यानुसार अशी कोणतीही मान्यता या शाळेला मिळाली नसल्याचे पालकांनी सांगितले. दरम्यान, शिक्षण विभागाचे उपसंचालक रामचंद्र जाधव, शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, शिक्षणाधिकारी अरुण आत्तार व महापालिकेचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी शाळेला भेट देऊन व्यवस्थापनाशी चर्चा केली.
(वार्ताहर)