नोटबंदीच्या विरोधात आंदोलन, निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 05:06 AM2017-11-09T05:06:12+5:302017-11-09T05:06:17+5:30
नोटबंदीच्या निषेधार्थ अनेक संस्था, संघटनांनी आंदोलन करून निषेध नोंदवला. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वराज्य अभियान, शेतकरी कामगार पक्ष नागरी हक्क सुरक्षा समिती यासह अनेक
पिंपरी : नोटबंदीच्या निषेधार्थ अनेक संस्था, संघटनांनी आंदोलन करून निषेध नोंदवला. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वराज्य अभियान, शेतकरी कामगार पक्ष नागरी हक्क सुरक्षा समिती यासह अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या. तर भाजपाच्या वतीने हा दिवस काळा पैसाविरोधी दिन म्हणून साजरा करण्यात आला. रिपब्लिकन पक्षातर्फे व्हाइट मनीदिन साजरा करण्यात आला.
पिंपरी : देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी, देशाच्या आर्थिक फायद्यासाठी आणि सामान्य माणसांच्या हितासाठी पंतप्रधानांनी एक वर्षापूर्वी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यामुळे दहशतवादी, काळा पैसा बाळगणारे आणि खोट्या नोटा वापरणाºयांचा तोटा झाला, तर भविष्यात सामान्यांना नक्कीच फायदा होणार आहे, असे प्रतिपादन दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट्स आॅफ इंडियाच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे उपाध्यक्ष अमोल भाटे यांनी बुधवारी केले.
नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाले. भाजपाच्या वतीने हा दिवस देशभर काळा पैसाविरोधी दिन म्हणून साजरा केला. त्यानिमित्त शहर भाजपाच्या वतीने आॅटो क्लस्टर सभागृहातील कार्यक्रमास अमोल भाटे यांनी नोटाबंदीचा निर्णय का योग्य आहे?, याबाबत मार्गदर्शन केले. या वेळी भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, प्रदेश सदस्य उमा खापरे, सदाशिव खाडे, सरचिटणीस सारंग कामतेकर, प्रमोद निसळ, अमोल थोरात उपस्थित होते.
अमोल भाटे म्हणाले, ‘‘नोटाबंदीचा निर्णय योग्य होता. देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी, देशाच्या फायद्यासाठी आणि सामान्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय आहे.
त्याचा देशभरातील असंख्य
लोकांना त्रास झाला. परंतु, कोणताही बदल घडवायचा असेल, तर त्रासाशिवाय शक्य नाही. या निर्णयाचा सामान्य आणि गरिबांऐवजी काळा पैसा असणाºयांनाच मोठा त्रास झाला. काळा पैसा बँकेत भरायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. भविष्यात चांगले दिवस नक्कीच दिसणार आहेत. देशातील केवळ ५ ते १० टक्के लोक कर भरतात. ९० टक्के नागरिक कर भरत नाहीत. कर भरण्याचे प्रमाण वाढवण्याचा नोटाबंदीचा उद्देश आहे. देश चालवण्यासाठी पैसा हवा असतो. कर भरण्याचे प्रमाण वाढले, तर विकासकामांसाठी वापर करता येईल. यापुढे आॅनलाइन व्यवहारावर भर देण्याची गरज आहे.’’
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ‘‘एक वर्षापूर्वी देशातून भ्रष्टाचार समूळ नाश व्हावा, दहशतवादाचे उच्चाटन व्हावे, परदेशातील काळा पैसा नष्ट व्हावायासाठी नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. देशभरातील सर्व नागरिक या निर्णयाच्या पाठीशी राहिले. सुरुवातीला त्रास झाला. मात्र, उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांनी हा त्रास सहन केला. कोणत्याही गोष्टीचा लगेच परिणाम दिसणार नाही. चांगला परिणाम येण्यासाठी निश्चित काहीकाळ लागेल. येत्या तीन-चार वर्षांत नोटाबंदीचा फायदा होत असल्याचे दिसेल.’’
व्हाईट मनी डे साजरा
पिंपरी : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गट पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शहर अध्यक्ष सुधाकर वारभुवन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व्हाईट मनी डे साजरा करण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशावरून संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर कार्यक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले. तसेच नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याने नोटाबंदीचे समर्थन करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब भागवत, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, सम्राट जकाते, अशोक गायकवाड, भरत खरात, विलास गरड, नितीन गायकवाड, बापू गायकवाड, रत्नमाला सावंत, राघू बनसोडे, राहुल खुने, दिलीप समिंदर आदी उपस्थित होते.
भारिप महासंघतर्फे निषेध
पिंपरी : केंद्र सरकारच्या नोटबंदी निर्णयाला वर्ष झाले. मात्र एकाही प्रश्नाची सोडवणूक झाली नाही. या सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार भारिप बहुजन महासंघ, पिंपरी-चिंचवड शहरतर्फे पिंपरीत लुटारूंचा दिवस आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
आंदोलनात भारिप बहुजन महासंघ, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, भारत कुंभारे, सुधीर कांबळे, सुधाकर साबळे, संजय खरात, संतोष जोगदंड, मिलिंद केदारी, सुभाष गवळी, राजू बनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.