संघटनात्मक बदलाच्या हालचाली, महापालिकेतील पराभवानंतर शिवसेनेला जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 04:57 AM2017-09-25T04:57:29+5:302017-09-25T04:57:37+5:30
महापालिका निवडणुकीत शिवसेनेस आलेले अपयश, यामुळे शहर शिवसेनेत संघटनात्मक बदलाचे संकेत पक्षप्रमुखांनी दिले आहेत.
पिंपरी : महापालिका निवडणुकीत शिवसेनेस आलेले अपयश, यामुळे शहर शिवसेनेत संघटनात्मक बदलाचे संकेत पक्षप्रमुखांनी दिले आहेत. शहरप्रमुख, विधानसभाप्रमुख, महिला अशा सर्व आघाड्यांमध्ये बदल करण्यात येणार आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांनी गजानन चिंचवडे यांचे नाव लावून धरले आहे, तर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख सुलभा उबाळे यांचे नाव लावून धरले आहे. शहरप्रमुखावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत करण्यासाठी सोमवारी बैठक होणार आहे. शिवसेना शहरप्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे.
महापालिका निवडणुकीत २०१२ मध्ये १४ जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीपूर्वी सीमा सावळे आणि आशा शेंडगे यांच्यावर निलंबनाची तोंडी कारवाई केली होती. २०१७च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेस नऊ जागा मिळाल्या. महापालिका निवडणुकीत दोन्ही खासदार आणि संपर्क नेते डॉ. अमोल कोल्हे यांनी गांभीर्याने लक्ष घातले नाही. भाजपा जेवढ्या प्रमाणावर आक्रमक झाली होती, त्या प्रमाणात शिवसेना नेत्यांनी लक्ष घातले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी सक्षम उमेदवार देता आले नाहीत. भाजपाच्या संघनीतीपुढे शिवसेनेला पराभव पत्करावा लागला. तीनवरील भाजपा ७६ वर गेली. तर १४ वरून शिवसेनेचे संख्याबळ नऊवर आले. महिला आघाडी प्रमुख सुलभा उबाळे यांचा पराभव झाला. पक्षाच्या कामासाठी वेळ मिळत नसल्याने कोल्हे हे जबाबदारीतून मुक्त झाले आहेत. त्यामुळे हे रिक्त झाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेनेही पक्षसंघटना बळकट करण्यासाठी मातोश्रीवर नुकतीच बैठक घेतली. त्यात शहरपातळीवर बदलाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शहर कार्यकारिणीत बदल होणार आहे.